भाजप तालुकाध्यक्षांच्या महाविद्यालयात काळिमा फासणारी घटना! राहात्यातील प्राध्यापकाविरोधात विनयभंगासह अॅट्रॉसिटीनुसार कारवाई
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध कारणांनी चर्चेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे यांच्या वामनराव इथापे डी फार्मसी महाविद्यालयात गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 21 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन मूळचा राहाता तालुक्यातील हसनापूरचा रहिवासी असलेल्या प्रा.आरषू पीरमोहंमद पटेल याच्या विरोधात विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गजाआड करण्यात आले आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डॉ.वामनराव इथापे डी. फार्मसी महाविद्यालयात गुरु व शिष्य यांच्या महान परंपरेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणार्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीवर याच महाविद्यालयातील शिक्षणसेवा देणार्या प्रा.आरषू पीरमोहंमद पटेल याची वक्रनजर पडली आणि त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून या तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली.
महाविद्यालयात असताना जाणीवपूर्वक त्या विद्यार्थीनीला जवळ बोलावणे, तिला लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे व तिच्या शारीरिक अंगांना स्पर्श करणे, तिच्या मोबाईलवर अश्लिल संदेश पाठवणे अशा प्रकारचे गैरकृत्य त्याने गेल्या वर्षभर केले. गुरुजन असल्याने आज सुधरतील, उद्या सुधरतील या भाबड्या आशेने त्या विद्यार्थीनीने या फालतू विषयापेक्षा आपल्या माता-पित्यांच्या स्वप्नांना अधिक महत्त्व देत शिक्षणाकडे अधिक लक्ष्य केंद्रीत केले, मात्र त्याचा परिणाम त्यास नराधमाचे दूष्कृत फोफावण्यात झाल्याने ती तरुणी त्यांच्या रोजच्या जाचाला वैतागली आणि तिने अखेर पोलीस ठाणे गाठले.
पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत यांनी संबंधित तरुणीला विश्वासात घेवून तिच्याकडून वास्तव माहिती घेतल्यानंतर जलदपणे कारवाई करीत आरोपी प्रा.आरषू पीरमोहंमद पटेल याला ताब्यात घेतले व संबंधित तरुणीच्या फिर्यादीवरुन त्याच्यावर भा.दं.वि. कलम 354, 354 ड, सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(डब्ल्यु)(।)(॥) प्रमाणे गुन्हा नोंद करुन त्याला तात्काळ गजाआड केले. या प्रकाराने संगमनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना अक्षरशः ऊत आला आहे.
अगदी प्राचीन काळापासून भारतात गुरु आणि शिष्य यांच्या नात्याला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. आपल्या शिष्याला अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जाणारा मार्ग दाखवणार्या या परंपरेला डॉ.वामनराव इथापे डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा.आरषू पीरमोहंमद पटेल याने काळीमा फासला असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणाचा सखोल तपास करुन संबंधित तरुणीने महाविद्यालय प्रशासनाकडे यापूर्वी तक्रार केलेली असल्यास व त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्यास महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासही सहआरोपी करावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
मध्यंतरीच्या काळात शहरालगतच्या एका उपनगरात याच महाशयांनी ‘लॉजींग’ सुरु केले होते. मात्र या ठिकाणी पथिकांच्या निवासापेक्षा ‘अनैतिक’ उद्योगच अधिक चालत असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावरुन संबंधित संस्था चालकाची वृत्ती अशा प्रकारांना पाठबळ देणारी तर नाही ना? असाही संशय निर्माण झाला असून या प्रकरणाचा सखोल तपास होवून दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. अन्यथा गुरु-शिष्य परंपरेला लागलेला हा बट्टा दीर्घकाळ पुसला जाणार नाही.