तरुणांनी मनातील न्यूनगंड दूर करून मोठे व्हावे ः आ. डॉ. तांबे स्वदेशचे संस्थापक बाळासाहेब देशमानेंचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीण भागातील तरुणांनी आपल्या मनात असणारा न्यूनगंड दूर करून प्रामाणिक प्रयत्न करत जिद्दीने व्यवसाय केला तर तुम्ही सुद्धा नक्कीच बाळासाहेब देशमाने यांच्यासारखे मोठे होऊ शकतात, असा सल्ला पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.

स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांच्या वाढदिवसानिमित्ताने धांदरफळ बुद्रुक (ता.संगमनेर) येथील बाजारतळावर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे तसेच अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. तांबे बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, गुजरात (सिल्वासा) येथील उद्योजक धंदरफळचे सुपुत्र भाऊसाहेब डेरे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, कारखान्याचे संचालक अनिल काळे, सरपंच भानुदास शेटे, स्वदेश प्रॉपर्टीचे संचालक मच्छिंद्र अरगडे, नवनाथ देशमाने, योगेश देशमुख, घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, हभप. सुदाम महाराज कोकणे, संगीता देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, अडचणीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब देशमाने यांचे व्यक्तिमत्व सर्वत्र ओळखले जाते. आम्हांला कुठल्याही बाबतीत अडचण आली तर सर्वप्रथम बाळासाहेब देशमाने यांच्याशीच संपर्क करत असतो. कारण त्यातून नक्कीच मार्ग निघण्याची खात्री असते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, बाळासाहेब देशमाने हे आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर फिरत असले तरी त्यांनी कधीच आपल्या मायभूमीकडे दुर्लक्ष केले नाही. सतत ते गावातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे.

मालपाणी उद्योग समूहाचे उद्योजक मनीष मालपाणी म्हणाले, बाळासाहेब देश माने यांच्याकडे कुठलेही राजकीय पद नसताना सुद्धा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्यांनी धांदरफळ गावासाठी 28 कोटी रुपयांचा निधी आणून गावात अनेक विकासाची कामे उभी केली आहेत. त्यांना कुठल्या प्रकारची निवडणूक लढवायची नाही फक्त गावात एक चांगली फळी तयार झाली पाहिजे यासाठी गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हाच ध्यास त्यांचा आहे. महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर म्हणाले, मानवी जीवनाकडून आपल्या देशाची समाजाची धर्माची व ईश्वराची सेवा करण्याचे पुण्याचे काम बाळासाहेब देशमाने यांच्याकडून होत आहे. आपल्या धांदरफळ बुद्रुक गावातील रामेश्वराचे मंदिर हे महाराष्ट्रातील पंढरपूर सारखे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र व्हावे यासाठी त्यांचा रात्रंदिवस प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि आणि तो रामेश्वराच्या कृपेने नक्कीच पूर्ण करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने म्हणाले, धांदरफळच्या विकासामध्ये खर्या अर्थाने परिवर्तन करण्याचे काम महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून झाले आहे. तर माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यात संगमनेरच्या मालपाणी ग्रुपचा खूप मोठा वाटा आहे. त्या ग्रुपमुळेच मी रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये माझ्या प्रामाणिक कामाचा ठसा उमटवलेला आहे. आयुष्यात तुम्ही मोठे नसता तर तुमच्या आई-वडील मोठे असतात. प्रास्ताविक धांदरफळ बुद्रुक गावचे सुपुत्र आणि सिल्वासा गुजरात येथील उद्योजक भाऊसाहेब डेरे यांनी केले. स्वागत जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केले. तर आभार सरपंच भानुदास शेटे यांनी मानले.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील एका लहान मुलाच्या बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी 50 लाख रुपयांची आवश्यकता होती ही बाब स्वदेश उद्योग समूहाचे बाळासाहेब देशमाने यांना त्या मुलाच्या वडिलांनी सांगितले. त्यांनी देशातील अनेक आपल्या मित्रपरिवाराला फोन करून मदतीची मागणी केली त्यांच्या हाकेला साथ देत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील संपूर्ण देशातील दानशूर मंडळींनी मोठी मदत केली आणि त्या मुलाच्या हृदय बदलण्याच्या शस्त्रक्रियेचे काम पूर्ण झाले हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचे सांगत गावातील प्रत्येक माणसाच्या हृदयात त्यांचे स्थान निर्माण केल्याचे यावरून अधोरेखित होत आहे.
