विद्यार्थ्यांचा सत्संग व गुरूपूजन सोहळा उत्साहात 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
सुमेरू एज्युकेशन सोसायटी संचलित श्री श्री रविशंकर विद्यामंदिरच्या वतीने कुबेर लॉन्स येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरूचरणी समर्पित असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गुरूंच्या चरणी श्रद्धा, समर्पण आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत विद्यार्थ्यांनी गुरूपूजन व सत्संगाचे सादरीकरण केले.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सत्संगातून गुरूंचे आपल्या आयुष्यातील स्थान, त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व आणि त्यांच्या प्रती असलेली आपली जबाबदारी यांची जाणीव करून दिली. त्यांच्या सादरीकरणात केवळ शब्द नव्हते, तर होती एक नितांत कृतज्ञतेची भावना.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या संस्थापिका स्वाती शाह,  सक्रेटरी समीर शाह, प्राचार्या आरती सप्रा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गुरूपूजनाने झाली. फुलांनी सजवलेले पावन व्यासपीठ, मंत्रोच्चार आणि विद्यार्थ्यांचा नम्र व कृतज्ञ दृष्टिकोन वातावरणाला पावनता लाभवणारा होता. ‘गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू…’ या श्लोकांचे सामूहिक पठण वातावरणात चैतन्य पसरवत होते.
पालकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या पाल्यांनी केलेले सादरीकरण पाहून त्यांचे डोळे पाणावले. अनेकांनी कार्यक्रमानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत शाळेचे मनःपूर्वक आभार मानले. सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी समृद्धी मंडलिक हिने केले. तसेच आराध्या थोरात हिने गुरूंची व गुरुपौर्णिमची महती सांगितली.कार्यक्रमासाठी वैशाली देशपांडे, नेहा डंग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सचिव समीर शाह, प्राचार्या व शिक्षकांनी आपल्या अनुभवातून गुरूंच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, ती विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया मजबूत करणारी गुरूंची कर्मभूमी आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
Visits: 171 Today: 1 Total: 1983819

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *