राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाचा प्रश्न नक्कीच मार्गी लावू! देवळाली प्रवराच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला खासदार सदाशिव लोखंडेंचे आश्वासन

 

नायक वृत्तसेवा, राहुरी
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या दिशेने नुकतेच पाहिले पाऊल पडले. हा प्रश्न मार्गी लावणेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळला. केंद्रीय रस्ते वाहतूक तथा राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून या भुयारी मार्गाची डीपीआरमध्ये तरतूद करण्याची मागणी केली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष सुनील कराळे, राहुरी अर्बन निधी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ काळे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे आदिंनी दि. 3 जानेवारी रोजी खासदार सदाशिव लोखंडे यांची वळद उंबरगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.

नगर-मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना धोकादायक अवस्थेत रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते. तसेच ताहराबाद-श्रीरामपूर रस्ता चौकात रहदारीचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून याठिकाणी अपघातही वाढले असल्याने या दोन्ही ठिकाणी भुयारी मार्ग होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले. दरम्यान, हा महामार्ग केंद्र सरकारच्या ताब्यात गेला असून त्यासाठी केंद्राने नुकताच निधी मंजूर केल्याने लवकरच या महामार्गाचे काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी या महामार्गावर राहुरी फॅक्टरी येथे वरील दोन ठिकाणी भुयारी मार्गाची तरतूद करण्यात यावी म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष सुनील कराळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, राहुरी अर्बन निधी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ काळे, साईसेवा निधी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप येवले, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार शेटे, नगरसेवक आदिनाथ कराळे आदी सर्वपक्षीय नागरिकांची स्वाक्षरी असलेले निवेदन शिष्टमंडळाने शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना उंबरगाव येथील निवासस्थानी दिले. याबद्दल ग्रामस्थांनी खासदार लोखंडे यांचे आभार मानले आहे.

 

भुयारी मार्गाच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक तथा राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिलेले आहे. त्याचा नेटाने पाठपुरावा करुन कायमचा प्रश्न मिटवू.
– सदाशिव लोखंडे (खासदार, शिर्डी)

Visits: 158 Today: 1 Total: 2061721

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *