प्रशासन आशा सेविका, गट प्रवर्तकांसह कोरोना उपचारांबाबत ठोस निर्णय घेणार ः डॉ.नवले
प्रशासन आशा सेविका, गट प्रवर्तकांसह कोरोना उपचारांबाबत ठोस निर्णय घेणार ः डॉ.नवले
अकोले तहसीलदारांसोबत तीन तास झालेल्या बैठकीत विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा
नायक वृत्तसेवा, अकोले
आशासेविका, आशा गट प्रवर्तक, निराधार वेतन, कोरोना तपासणीची संथगती व संरक्षण साहित्य उपलब्धतेबाबत आज (शुक्रवार ता.11) तहसील कार्यालयात ‘माकप’ने घेतलेल्या बैठकीत प्रशासनाकडून समस्यांची उकल करण्याबाबत ठोस आश्वासन घेतले असल्याची माहिती किसान सभेचे शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांनी दिली.
कोरोना सर्वेचा पुरेसा मोबदला न देता आशांना प्रतिदिन केवळ 33 रुपये व आशा गट प्रवर्तकांना प्रतिदिन 16 रुपयांत राबवून घेतले जात आहे. कोरोना महामारीपासून संरक्षणाची कोणतीही पुरेशी साधने न देता महिला कर्मचार्यांना अशाप्रकारे राबवून घेणे थांबवावे, स्थानिक विकास निधीतून कोरोना सर्वेसाठी आशांना प्रतिमहिना किमान 3 हजार रुपये व आशा गट प्रवर्तकांना किमान 5 हजार रुपये अतिरिक्त मानधन द्यावे. अन्यथा कोरोना सर्वेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा सिटू संलग्न जनशक्ती आशा कर्मचारी संघटनेने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदनातून दिला होता.
तसेच ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर उपलब्ध असलेल्या स्थानिक विकास निधीतून महिन्याला 3 हजार रुपये कोरोना सर्वेसाठी तरतूद करणे अजिबात अवघड काम नसल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. नेत्यांच्या सत्कारासाठी हजारो रुपयांचा चुराडा करणार्या ग्रामपंचायती व नगरपरिषदा कोरोना सर्वेसाठी अशाप्रकारची तरतूद करायला तयार नसतील तर आशा सुद्धा आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकून केवळ 33 रुपयांत सर्वे करायला तयार नाहीत अशी निःसंदिग्ध भूमिका संघटनेने घेतली होती. स्थानिक विकास निधीतून आशांना सॅनिटायझर, ग्लोव्ह्ज, मास्कसह इतर पुरेशी संरक्षण साधने उपलब्ध करून द्यावीत, कोरोना संसर्ग झाल्यास आशा कर्मचारी, गट प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबाला प्राधान्याने तपासणी व मोफत उपचार उपलब्ध करून द्यावे, तालुक्यातील जनतेसाठी तालुक्यातच कोरोना तपासणीची पुरेशी सुविधा उपलब्ध करावी, खानापूर कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात आदी मागण्यांबाबत लोकप्रतिनिधींशी आणि प्रशासनाशी सकारात्मक चर्चा करण्यात येऊन ठोस निर्णय घेतला जाईल असा विश्वास तहसीलदार कांबळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांनी व्यक्त केला.
सदर मागण्या भारती गायकवाड, संगीता साळवे, सुनीता गजे, अस्मिता कोते, सुजाता गायके, मंगल गावंडे, चित्रा हासे, चित्रा डगळे, आशा उगले, जानका परते, रुपाली तातळे, स्वाती ताजने, मनीषा मंडलिक, शालिनी वाकचौरे, नयना पांडे, संगीता धुमाळ, आशा देशमुख, चंद्रकला हासे, वंदना बांगर, विद्या वाकचौरे, सविता गाडे आदिंनी केल्या होत्या. आजच्या बैठकीस किसान सभेचे डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, खंडू वाकचौरे, युवक संघटनेचे एकनाथ मेंगाळ, देवराम डोके व जनवादी महिला संघटनेच्या जुबेदा मणियार, सुमन इरणक आदी उपस्थित होते.