‘एक स्वयंसेवक एक झाड’ उपक्रम राबविण्याचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा संकल्प

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक स्वयंसेवक एक झाड’ हा उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.

चालू शतकातील जागतिक तापमानवाढ व वातावरणातील बदल या सारख्या मनुष्यनिर्मित समस्येला तोंड देण्यासाठी सामुदायिकरित्या वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त होत आहे. पर्यावरणाने भरभरून दिले असतानाही माणूस वसुंधरेचे शोषण करीत आहे, ही जाणीव ठेवून संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड उपक्रम आयोजित करण्यात आला होता.पर्यावरण संतुलनाच्या बाबतीत झाडांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. झाडे पाऊस देतात, पाणी अडवितात आणि जमिनीची धूप थांबवून जमिनीमध्ये पाणी मुरवितात सुद्धा. म्हणूनच वृक्ष तोडीला आळा घालून मोठ्याप्रमाणात वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.
त्यादृष्टीने संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी वृक्ष लागवडीचा ध्यास घेत ‘एक स्वयंसेवक एक झाड’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प करत महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रविंद्र ताशिलदार, उपप्राचार्य डॉ. प्रविण त्र्यंबके, कार्यक्रमाधिकारी डॉ. वसंत खरात, डॉ. रोशन भगत, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. दिपक गपले, कुलसचिव संतोष फापाळे, बाबासाहेब घोटेकर उपस्थित होते.
भविष्यकाळात पर्यावरण असमतोलाचे दुष्परिणाम उद्भवू नयेत यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वृक्षलागवड व संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांनी यावेळी स्वयंसेवकांना केले.
Visits: 208 Today: 1 Total: 1591036

