पिंपळगाव खांड धरणात अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करून पठार भागाला पाणी देणार समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर सकारात्मक निर्णय घेवू : ना.विखे पाटील

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणात अतिरिक्त पाणीसाठा कसा निर्माण करता येईल, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमून त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सकारात्मक निर्णय घेत संगमनेरच्या पठार भागातील जवळे बाळेश्वर सह ११ गावे आणि २१ वाड्यांना पाणीपुरवठा करणे शक्य होईल असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.

पिंपळगाव खांड धरणातून तालुक्यातील पठार भागातील जवळे बाळेश्वर सह ११ गावे आणि २१ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे आणि आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वात सावरगाव घुलेचे सरपंच नामदेव घुले, डोळासणेंचे उपसरपंच बाळासाहेब काकड, पिंपळगाव देप्याचे माजी उपसरपंच पांडुरंग गुंड, सावरगाव घुलेचे माजी सरपंच अर्जुन लहानु घुले, पत्रकार गोरक्षनाथ मदने यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईतील ‘रॉयल स्टोन’ या निवासस्थानी भेट घेत आपले गाऱ्हाणे त्यांच्या कानी घातले. आणि श्री बाळेश्वर संयुक्त पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सभेत झालेल्या ठरावाचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांना सुपूर्द केले. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील पठार भाग पर्जन्यछायेच्या अवर्षणप्रवन क्षेत्रात येत असून प्रत्येक वर्षी फेब्रुवारीपासूनच स्थानिक पातळीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आहे. सदर गावांची पाणीटंचाई निवारणार्थ शासनाला १९७२ पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. येथील पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाने जवळे बाळेश्वर सह अकरा गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड उद्धवतातून यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर योजनेचे कामही प्रगतीपथावर आहे. श्री बाळेश्वर संयुक्त पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे जवळे बाळेश्वर सह या योजनेत समाविष्ट असलेल्या ११ गावांच्या ग्रामसभेचे ठराव प्राप्त झाले असून या ठरावावर चर्चा करण्यात आली. आणि योजनेत समाविष्ट असलेल्या पठारावरील ११ गावे आणि २१ वाड्यांना पिंपळगाव खांड धरणात पाणीसाठा निर्माण करण्यासाठी ‘गोडबोले गेट’ बसवण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे म्हटले असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर कार्यवाही करावी यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.

संगमनेरच्या पठार भागातील जवळे बाळेश्वर, सावरगाव घुले, वरुडी पठार, महालवाडी, पिंपळगाव माथा, पोखरी बाळेश्वर, सारोळे पठार, माळेगाव पठार, कर्जुले पठार, डोळसणे, पिंपळगाव देपा या ११ गावांसाठी आणि २१ वाड्यांसाठी तब्बल ६५ कोटी ५० लाखाच्या या योजनेला २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळून २०२३ मध्ये या योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. सध्या या योजनेच्या अनेक गावातील पिण्याच्या पाण्याच्या मनोरा आणि बैठक टाक्यांची कामे झाली आहेत. त्याचबरोबर गाव अंतर्गत आणि वाड्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत पाईपलाईनही पूर्णत्वास गेल्या आहेत. पिंपळगाव खांड ते या योजनेतील गावे साधारण २३ किलोमीटर अंतरावर एक फुटाचा व्यास असलेल्या मेन पाईपलाईनद्वारे हे पाणी येण्याचे प्रस्तवित आहे. सध्या या योजनेचे काम अकोले तालुक्यातील लिंगदेव पर्यंत पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित लिंगदेव ते पिंपळगाव खांड या चार किलोमीटरच्या अंतरात हे काम स्थानिक शेतकऱ्यांच्या अडवणुकीमुळे रखडले आहे. त्यामुळे पठारावरील ही महत्त्वाची पाणी योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यातून तोडगा काढावा आणि पठारावरील जनतेला पिण्याचे पाणी द्यावे यासाठी या शिष्टमंडळाने आमदार डॉ. किरण लहामटे,आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वात भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले.त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पिंपळगाव खांड धरणात अतिरिक्त पाणीसाठा कसा निर्माण करण्यात येईल यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर समतोल राखत योग्य पर्याय निवडून पाणी देण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले.

तब्बल २३ किलोमीटरच्या या योजनेचे काम पठारावरून अकोले तालुक्यातील लिंगदेव पर्यंत पूर्ण झाले आहे. केवळ लिंगदेव ते पिंपळगाव खांड या चार किलोमीटरच्या अंतरात या योजनेला खिळ बसली आहे. पिंपळगाव खांड धरण लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी आमचे हक्काचे पाणी आम्ही या योजनेला देणार नाही, त्यासाठी अतिरिक्त पाणी साठा निर्माण केला तर आमचा या योजनेला विरोध असायचे काही कारण नाही असे सांगितले आहे. त्यामुळे ही योजना अद्याप पर्यंत रखडली आहे. त्यामुळे पठारावरील जनतेची तहान भागवायची असेल तर पिंपळगाव खांड धरणात अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.

Visits: 149 Today: 1 Total: 1416904
