हलगर्जीपणातून दोघांचा जीव घेणाऱ्या तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवध! ठेकेदार कातोरे पिता-पुत्राचा समावेश; ठेकेदाराने परस्पर उद्योग केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बंद असलेल्या आणि गेल्या अनेक वर्ष न उघडलेल्या गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी वायूची निर्मिती होते हा सरळ सिद्धांत असताना संगमनेरच्या एका आडहत्यारी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोघा तरुणांचा हकनाक बळी गेला. सध्या शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतर्गत भूमिगत गटारांचे काम सुरु आहे. यादरम्यान कोल्हेवाडी रस्त्यावरील पाबळे वस्तीच्या कॉर्नरवर गटार तुंबल्याने मुस्ताक शेख या ठेकेदाराने पालिकेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर अनेक दिवस बंद असलेल्या गटारात एकाला उतरवले बराच वेळ त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याला पाहण्यासाठी अन्य दोघे खाली उतरले. मात्र त्यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने हा सगळा प्रकार समोर आला. त्यात दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपाधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पोलिसांनी जमावाची समजूत काढीत आज पहाटे प्रकल्पाचे मुख्य ठेकेदार रामहरी कातोरे यांच्यासह त्यांचा मुलगा निखिल आणि शहरातील गटारींवर अधिराज्य गाजवणाऱ्या मुस्ताक शेख अशा तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून या तिघांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.या घटनेत ठेकेदारांच्या हलगर्जीपणाने दोघा तरुणांचा बळी गेल्याने शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना गुरुवारी (ता.१०) दुपारी चार वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रस्त्यावरील पाबळे वस्तीकडे जाणाऱ्या एका कॉर्नरवर घडली. याबाबत संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक अमजद पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, गुरुवार दि.१० जुलै रोजी शहरातील कोल्हेवाडी रोडवर पाबळे वस्तीकडे जाणाऱ्या कॉर्नर जवळील गटार साफसफाई करतांना अतुल रतन पवार (वय १९,रा. संजय गांधी नगर, वडार वस्ती संगमनेर) या मजुराचा व त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या रियाज जावेद पिंजारी (वय २१,रा. मदिनानगर, संगमनेर) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला असुन त्यांसदर्भात ठेकेदार मे.आर.एम कातोरे अँड कंपनी करीता रामहरी मोहन कातोरे व निखील रामहरी कातोरे (रा.गोविंद नगर, संगमनेर) मे. बी.आर. क्लिनीग करीता, मुश्ताक बशीर शेख (रा.शिवाजीनगर, संगमनेर) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करणेबाबत नगरपरिषद संगमनेर या कार्यालयाकडील जा.क्र.सं.न.प./आरोग्य-४/ ८३२०२५/३९२ दि.१० जुलै २०२५ अन्वये प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद, संगमनेर यांनी मला प्राधिकृत केले असुन सदर घटनेसंदर्भात माझी फिर्याद अशी की,संगमनेर नगरपरिषद हद्दीतील गटारीवरील चेंबर नगरपरिषदेने भुमिगत गटार योजनेसाठी जा.क्र. बांध/१४/१५५५/२०२१ दि. १२/७/२०२१ अन्वये मे. आर.एम. कातोरे ॲड कंपनी करीता रामहरी मोहन कातोरे व निखील रामहरी कातोरे रा गोविंद नगर, संगमनेर यांना दिलेल्या कार्यारंभ आदेशानुसार भुमिगत गटार योजनेचे काम दिले आहे.
या कार्यारंभ आदेशानुसार भुमीगत गटार योजनेचे काम पुर्ण झालेले नाही, व त्यामुळे ते अद्याप नगरपरिषदेकडे ठेकेदाराने हस्तांतरीत केलेले नाही. भुमीगत गटार योजनेचे संपुर्ण काम पूर्ण झाल्यानंतर ते नगरपरिषदेकडे रितसर हस्तांतरीत होई पर्यंत योजनेतील सर्व बाबींच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही ठेकेदार यांचेशी झालेल्या करारनाम्यातील अट क्रमांक ३८ नुसार ठेकेदार मे. आर. एम कातोरे ॲड कंपनी करीता रामहरी मोहन कातोरे व निखील रामहरी कातोरे रा गोविंद नगर, संगमनेर यांची आहे. तसेच भुमिगत गटार योजनेत बांधलेल्या या चेंबरची देखभाल व दुरुस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सर्वस्वी मे. आर.एम कातोरे ॲड कंपनी करीता रामहरी मोहन कातोरे व निखील रामहरी कातोरे रा गोविंद नगर, संगमनेर यांची आहे.
संगमनेर नगरपरिषद मार्फत आरोग्य विभागाकरीता संगमनेर शहरातील व उपनगरीतील मोठ्या व बंदिस्त गटारी साफ करणे करीता संगमनेर नगरपरिषद कार्यालयाकडील जावक क्रमांक सं.न.प./आरोग्य/३३१/१०/२०२४ दि. ७.८.२०२४ अन्वये कार्यारंभ आदेश हे मे. बी.आर.क्लिनीग करिता, प्रो. मुश्ताक बशीर शेख रा शिवाजीनगर, संगमनेर
यास दिनांक ७.८.२०२४ रोजी पासुन एक वर्षाकरीता मुदतवाढ देण्यात आली होती. सदर बाबत दि. ६.८.२०२४ रोजी सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरीता गटारी साफ करणेबाबत कामाचा करारनामा मे. बी. आर. क्लिनीग करिता, प्रो. मुश्ताक बशीर शेख रा शिवाजीनगर, संगमनेर याचे सोबत करण्यात आला होता.
सदर करारामध्ये एकुण १ ते ३० अटी व शर्ती नमुद ठेकेदारास देण्यात आल्या होत्या. तेंव्हापासुन मे. बी. आर. क्लिनीग करिता, प्रो. मुश्ताक बशीर शेख रा शिवाजीनगर, संगमनेर हा त्याचेकडील असलेल्या मजुरांकडुन संगमनेर शहरातील व उपनगरीतील मोठ्या व बंदिस्त गटारी साफ करण्याचे काम करत होता,मे. आर.एम कातोरे अँड कंपनी करीता रामहरी मोहन कातोरे व निखील रामहरी कातोरे रा गणेश नगर, संगमनेर यांनी त्यांचेकडील कामाचा ठेका पुर्ण केलेला नव्हता. त्यामुळे त्या कामावरील सर्व जबाबदारी करारनाम्यातील अटी व शर्ती नुसार त्यांचेकडेच होती व आहे. दरम्यान करारनाम्याप्रमाणे बंदीस्त व उघड्या गटारी साफ करणेकामी आरोग्य विभागा मार्फत लेखी वर्क ऑर्डर निर्गमीत केल्यानंतरच गटार साफ सफाईचे काम करणे बाबत व परस्पर अथवा विना वर्क ऑर्डर काम न करणेबाबत करारनाम्यात नमुद असताना त्यांनी त्यांचेकडे करारनाम्याचे भंग केला आहे.
तसेच मे. बी. आर. क्लिनीग करिता, प्रो. मुश्ताक बशीर शेख रा शिवाजीनगर, संगमनेर याने त्याचेकडील मजुरांमार्फत दि. १०.७.२०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याचे सुमारास आरोग्य विभागाची परवानगी न घेता कोल्हेवाडी रोडवर पाबळे वस्तीकडे जाणाऱ्या कॉर्नर जवळील बंदिस्त गटार साफ सफाईचे काम सुरु केले. नमुद ठेकेदार याने करारनाम्यातील अट क्रमांक २ चे उल्लंघन करून सदरचे काम करण्यास सुरुवात केली. सदरचे काम हे ठेकेदार याने त्याचेकडील मजुर यांची दक्षता न घेता करारनाम्यातील अट क्रमांक ६ चे उल्लंघन करुन आरोग्य विभागाचे पुर्वपरवानगी शिवाय गटारीवरील चेंबर साफ सफाईचे काम सुरु केले. सदर गटार साफ सफाई दरम्यान वापरण्यात येणाऱ्या मजुरांना अपाय होणार नाही याकरीता खबरदारी म्हणुन रबरी हात मौजे, गमबुट, मास्क, गोंगल, कैंप ॲप्रन तसेच गटार स्वच्छ करण्यासाठी सक्शन मशिनचा वापर केला नाही, इत्यादी साहित्य उपलब्ध करुन देणेबाबत करारनाम्यातील अट क्रमांक २१ मध्ये नमुद असताना देखील ठेकेदार मुश्ताक बशीर शेख रा शिवाजीनगर, संगमनेर याने त्याचेकडील मजुर अतुल रतन पवार (वय १९, रा.संजय गांधीनगर, संगमनेर) यास आवश्यक साहित्यानिशी न देता गटारीचे साफ सफाईचे कामास पाठविल्याने नमुद मजुर जखमी झाल्याचे आम्हाला समजले.
सदरची घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर मी तसेच मुख्याधिकारी व नगरपरिषदेचे कर्मचारी असे आम्ही घटना ठिकाणी गेलो. घटना ठिकाणी गेल्यानंतर आम्ही गटारीमध्ये बघितले असता ठेकेदाराने गटारीमध्ये पाठविलेला मजुर अतुल रतन पवार व त्याचे सोबत अजुन एक मुलगा हे अत्यावस्थेत गटारीत पडलेले होते. त्यावेळी आम्ही व तेथे जमलेल्या लोंकानी जेसीबीच्या मदतीने त्या दोघांनाही बाहेर काढुन उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये पाठविले, त्यानंतर मला समजले की, ठेकेदार याने गटारीत उत्तरविलेला मजुर अतुल रतन पवार याचा व त्याला वाचविण्यासाठी गेलेला रियाज जावेद पिंजारी (वय २१, रा.मदिनानगर, संगमनेर) या दोंघाचा गुदमरून कुटे हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
दि.१०.७.२०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याचे सुमारास संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर एस.टी.पी प्लॅट चे ठेकेदार मे. आर. एम कातोरे ॲड कंपनी करीता रामहरी मोहन कातोरे व निखील रामहरी कातोरे रा गोविंद नगर, संगमनेर यांनी नगरपालिकेशी झालेल्या करारनाम्याप्रमाणे काम केले नाही, कराराचे उल्लंघन केले. एस.टी.पी. प्लॅटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सुरक्षीतते बाबत योग्य ती काळजी घेतली नाही.

तसेच पाबळे वस्तीकडे जाणाऱ्या कॉर्नर जवळील गटारीची साफ सफाई करण्याकरीता ठेकेदार. बी. आर. क्लिनीग करिता, प्रो. मुश्ताक बशीर शेख रा शिवाजीनगर, संगमनेर याने व या दोन्ही ठेकेदारांनी करारानाम्यात दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करुन आरोग्य विभागाच्या पुर्वपरवानगी शिवाय त्याचेकडील मजुरास विनासाहित्य गटारीत उत्तरविल्यास त्याचा मृत्यु घडुन येण्याचा संभव आहे याची जाणीव असताना देखील निष्काळजी पणाचे कृत्य केल्याने त्याचेकडील मजुर अतुल रतन पवार व त्याला वाचविण्यासाठी गेलेला रियाज जावेद पिंजारी या दोंघाचा गटारीमध्ये गुदमरुन मृत्यु झाला असुन त्या दोंघाचे मृत्युस ठेकेदार में आर एम कातोरे ॲड कंपनी करीता रामहरी मोहन कातोरे, निखील रामहरी कातोरे व मे बी. आर. क्लिनीग करिता, प्रो. मुश्ताक बशीर शेख हे कारणीभूत झाले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गुरुवारी (ता.१०) दुपारी घडलेल्या या घटनेत आडहत्यारी ठेकेदार मुस्ताक बशीर शेख याचा हलगर्जीपणा ठळकपणे समोर आला आहे. त्याने कुठलीही पूर्वकाळजी न घेता या तरुणांना गटार स्वच्छ करण्यासाठी अपूऱ्या संसाधनांसह उतरवल्यानेच सदरची घटना घडली. त्याचप्रमाणे सध्या सांडपाणी प्रकल्पातंर्गत शहरातील सर्व गटारांवर ताबा असलेले रामहरी मोहन कातोरे यांच्यासह त्यांचे सुपूत्र निखिल यांनीही पालिकेला कोणतीही सूचना न देता परस्पर सदरची गटार उकरली त्यातून हा सगळा प्रकार घडला. कातोरे पिता-पूत्रावर यापूर्वीही चिखली वाहन जळीत प्रकरणात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे, त्यात आता सदोष मनुष्यवधाचाही समावेश झाल्याने कातोरे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

Visits: 38 Today: 2 Total: 1103214
