आदिवासी कुटुंबाला युवक काँग्रेसकडून मदतीचा हात
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील पाडाळणे येथील अनाथ झालेल्या नातवांचा एका सत्तरवर्षीय आजोबांना सांभाळ करण्याची दुर्देवी वेळ आली. परंतु, नातू विशाल आणि नात ऐश्वर्याने शिक्षण घेऊन मोठं व्हायचं, असा ध्यास उराशी बाळगून आजोबांना जगण्याचा धीर दिला आहे. तर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे रवी डोंगरे यांनी कार्यकर्त्यांसह मदत करत अधिक बळ दिले आहे.
कोतूळच्या पश्चिमेला आठ किलोमीटरवर अंतरावर पाडाळणे हे गाव आहे. या गावातील ‘कॉलनी’ नावाची आदिवासी समाजाची वस्ती आहे. येथील सुखदेव तुळशीराम धराडे हे सत्तरीतील आजोबा कोतूळ येथील एका शेतकर्याकडे मोलमजुरी करतात. तर घरात वृद्ध पत्नी आणि दोन अनाथ नातवंडे एका कौलारू घरात राहतात. थकलेल्या आजोबांना घर चालवता चालवता यंदा दिवाळी करताच आली नाही. त्यांची सून एक वर्षापूर्वी तर मुलाचा सहा महिन्यापूर्वी एका दुर्धर आजाराने मृत्यू झाला आहे. घरी अवघी दहा गुंठे कोरडवाहू जमीन आहे. सून आणि मुलाच्या आजारात रोजंदारीचे पैसे आणि घरातील चीजवस्तू विकल्या. तरीही सून व मुलगा वाचला नाही. त्यांची दोन मुले विशाल (इ. 4 थी.) व ऐश्वर्या (इ. 2 री.) यांना सांभाळताना आजोबा धराडे हतबल झाले आहेत. मात्र विशाल आणि ऐश्वर्या यांना शिक्षण घेवून मोठं व्हायचं आहे, यासाठी त्यांना बळ मिळण्यासाठी मदतीची गरज आहे. याची सामाजिक कार्यकर्ते तथा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रवी डोंगरे यांनी दखल घेत मदतीचा हात म्हणून सहा महिने पुरेल एवढा किराणा व धान्य दिले आहे. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी देखील मदत करु असे आश्वासनही दिले. याकामी सुनील डोंगरे, पप्पू औटी, बजरंग शिरोळे, दादासाहेब रोडे, शरद मते, संतोष लोढा, सुमित लांडगे, महेश जेधे, अमोल हांडे, जमीर शेख आदिंचे सहकार्य लाभले.