संगमनेरातील महामार्गांनी घेतले वर्षभरात सदतीस जणांचे जीव! महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होऊनही वाहनचालक करतात नियमांची पायमल्ली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाच्या विकासात अंतर्गत वाहतुकीच्या रस्त्यांना अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारांकडून सतत रस्त्यांची कामे सुरू असतात. महाराष्ट्रातही विविध राष्ट्रीय, राज्य आणि जिल्ह्यातंर्गत मार्गांमुळे दळणवळणाचे जाळे निर्माण झाले आहे. त्यातील प्रमुख मार्गांपैकी असलेल्या पुणे-नाशिक आणि कोल्हार-घोटी या महामार्गांनी तर मोठ्या भागात समृद्धी निर्माण केली आहे. मात्र या समृद्धीसोबतच वाहतुकीच्या नियमांना बगल दिली गेल्याने अपघातांची श्रृंखला आणि त्यातून अनेकांचे बळी जाण्याचे वेदनादायी प्रसंगही वारंवार समोर आले आहेत. संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या या दोन्ही महामार्गांवरही सरत्या वर्षभरात अर्धशतकीय अपघात घडले असून त्यातून सदतीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर चाळीसहून अधिक जण जखमी झाले आहे.

नूतनीकरण झाल्याने पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची गती अधिक वेगवान झाली आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघातांमध्येही सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. तर नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निविदा निघूनही केवळ कागदावरच असलेल्या आणि अक्षरशः चाळण झालेल्या कोल्हार-घोटी राज्य मार्गावर खड्डे चुकविण्याच्या नादात अथवा खड्ड्यांचा अंदाजच न आल्याने सातत्याने अपघात घडल्यानेही अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. आजही ही श्रृंखला अव्याहत आहे. संगमनेरच्या विकासात या दोन्ही महामार्गांचे स्थान मोठे आहे. मात्र त्यासोबतच या दोन्ही ठिकाणी झालेले अपघात आणि त्यातून बळी गेलेल्यांची संख्या लक्षात घेता अपघात घडणार नाहीत यासाठी काहीतरी ठोस कृती करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षभरात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील अपघातांची आकडेवारी विचारात घेतली असता, चालू वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पाच आपघात घडले त्यात चौघांचे बळी गेले आणि एकजण जखमी झाला. फेब्रुवारीमध्ये वर्षातील सर्वाधीक नऊ अपघातांत पाच जणांचा जीव गेला, तर सहाजण जखमी झाले. मार्चमध्ये पाच अपघातात पाच बळी गेले. कोविडच्या प्रादुर्भावामुळे एप्रिलपासून वाहतूक बंद झाल्याने हा महिना अपघात मुक्त ठरला. तर मे मध्ये तीन अपघातात दोघांचे बळी व एकजण जखमी झाला. जूनमध्ये वाहतूक सुरू होताच पुन्हा अपघातांची श्रृंखलाही सुरु झाली आणि या महिन्यात आठ अपघातात सात जणांचे जीव गेले आणि एकजण जखमी झाला. जुलैमध्ये दोन घटनांत एकजण ठार तर दोनजण जखमी झाले. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी चार घटनांत आठजण ठार झाले. ऑक्टोबरमध्ये याच सरासरीने चार अपघात घडले, त्यातून दोघांचे बळी गेले तर दोघे जखमी झाले. नोव्हेंबरमध्ये दोघांचे बळी गेले तर चालू महिन्यात आत्तापर्यंत पाच घटनांमध्ये तिघांचे जीव गेले. यावर्षी कोविडमुळे प्रवाशी वाहतुकीवर बर्‍याच मर्यादा होत्या, त्यामुळे अपघातांची संख्या आणि त्यात बळी गेलेल्यांच्या संख्येतही मोठी घट होवून वर्षभरात पन्नास अपघातात सदतीस जणांचे बळी गेले व 40 जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या.
वाहन चालविताना चालक व प्रवाशांसाठी शासनाने नियम घालून दिलेले आहेत. तरी देखील अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. अनेकदा वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालत असल्याचेही प्रकार झालेले आहेत. प्रवास करताना अतिवेगाने वाहन चालविणे, वळणावर पुढील वाहनाला मागे टाकणे (ओव्हरटेक), वेगावर नियंत्रण न झाल्याने वाहन पलटी होणे, पुढे जाणार्‍या मालट्रकवा अवजड वाहनांना पाठीमागून धडकणे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे, अवजड वाहतूक करणार्‍या वाहनाला परावर्तक (रिफ्लेक्टर) नसल्याने अंधारात वाहने दिसून न येणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे, वाहनांची नादुरुस्ती आणि दरड कोसळणे अशी प्रमुख कारणे अपघातांस कारणीभूत ठरत असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. वारंवार प्रबोधन करुन, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुनही वाहनचालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत असल्याने अपघात वाढत असल्याचेही पोलिसांचे निरीक्षण आहे.

याचबरोबर सद्यस्थितीत महामार्गांची दुरावस्था झालेली असल्याने अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी संबंधित महामार्गाची देखभाल करणार्‍या कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिकांनी आणि माध्यमांनी आवाज उठवूनही कामे अपूर्ण असल्याने आजही अपघातांची श्रृंखला कायम असून त्यातून निष्पापांचे बळी जात आहेत. प्रशासनाने प्रबोधनाबरोबर महामार्गांच्या दुरुस्तीसाठी पावले उचलून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही अपघातग्रस्त वारंवार व्यक्त करीत आहेत.

डोळासणे महामार्ग पोलिसांच्या नियंत्रणात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड ते कर्‍हेघाट अशी 66 किलोमीटरची हद्द तर कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील कोकणगाव ते बारी घाट अशी सत्तर किलोमीटरची हद्द येते. या अंतर्गत संपूर्ण वर्षभरात (सन 2020) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 1 कोटी 90 लाख 69 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनेकदा प्रबोधनासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. मात्र तरीही वाहनचालक नियमांना पायदळी तुडवत असतात. यातून दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
– भालचंद्र शिंदे
(पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस, संगमनेर)

Visits: 49 Today: 1 Total: 433755

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *