वांबोरीतील जुगार अड्ड्यावर छापा; एक लाखाचा मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी येथील जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने मंगळवारी (ता.23) छापा मारत 1 लाख 3 हजार रुपयांच्या मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेतले आहे.
श्रीरामपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत वांबोरी येथील कुसमुडे वस्तीजवळ काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पोलीस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता संतोष नवनाथ कुसमुडे (वय 34, रा.कुसमुडे वस्ती वांबोरी), राहुल सतीश नन्नवरे (वय 21, रा.राहुरी वेस), शंकर सुखदेव कात्रज (वय 38, रा.गडाख वस्ती वांबोरी) व किरण राजेंद्र कुसमुडे (रा.राहुरी वेस वांबोरी) असे चौघे आढळून आले. त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अन्य दोन आरोपी फरार असून सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गु.नों.क्र. 177/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदिंनी केली.