पठारभागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा! रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा चिंताग्रस्त

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठारला शनिवारी रात्री अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने गहू, हरभरा, कांदे, मका, द्राक्षे व डाळिंब यांसह जनावरांच्या चार्‍याचेही मोठे नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली होती. आधीच कोरोना महामारीचे संकट आणि त्यात निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पुरते कोलमडणार असल्याने बळीराजा पुरता वैतागून गेला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यासह पठारभागात अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले. वातावरणात सातत्याने बदल होऊन अचानक अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, गहू व हरभरा शेतामध्ये अक्षरशः पाणी साचल्याने पिके सडण्याची शक्यताही अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. त्यातच नगदी पिके म्हणून ओळख असलेल्या द्राक्षे व डाळिंब बागांनाही मोठा फटका बसल्याने अपेक्षा धरुन बसलेला हंगामही वाया जाणार असल्याच्या चिंतेत शेतकरी लोटले आहे. साठवण करुन ठेवलेला लाल कांदाही अवकाळीच्या तडाख्यातून सुटला नाही.

पठारावरील हिवरगाव पठारसह संपूर्ण पठारभागात अवकाळीने जोरदार बरसात करुन सर्वत्र पाणीच पाणी केले. ओढे-नाले ऐन हिवाळ्यत तुडूंब भरून वाहात होते. तर अनेक शेतकर्‍यांच्या घरात पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली होती. अनेकांची उभी पिके अक्षरशः भुईसपाट झाल्याने पुन्हा तग धरेल की नाही याचीही शंका आहे. या अस्मानी संकटात रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान होण्याबरोबर ठिबक सिंचनाचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार संकटे येत असल्याने बळीराजा पुरता वैतागून गेल्याचे दृश्य सर्वत्र पहायला मिळत आहे.

संगमनेर तालुक्याचा पठारभाग म्हंटला की दुष्काळी भाग अशीच चर्चा होते. त्यावरही मात करुन पिके घेऊन शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात. परंतु, कोरोना संकट, वातावरणाचा लहरीपणा आणि आत्ताचा अवकाळी यामुळे कसेबसे सावरुन नव्या उमेदीने उभे राहिलेल्या बळीराजाला पुन्हा झटका बसल्याने आर्थिक गणित पुरते कोलमडणार असल्याची चिंता सतावत आहे. यामुळे उदरनिर्वाहासह, शिक्षण, आरोग्य आदी मुलभूत गरजा भागविणेही मुश्किल होणार असल्याची करुण भावना शेतकरी व्यक्त करु लागले आहेत.

Visits: 121 Today: 4 Total: 1109895

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *