कृत्रित हौदामध्ये गणेश विसर्जनाला बजरंग दलाचा विरोध
कृत्रित हौदामध्ये गणेश विसर्जनाला बजरंग दलाचा विरोध
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सालाबादप्रमाणे यावर्षीचे गणेश विसर्जन मंगळवार दि.1 सप्टेंबर, 2020 रोजी आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पालिकेतर्फे सात कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. यास विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी बजरंग दलाने तीव्र विरोध केला असून, वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून मुख्याधिकार्यांकडे केली आहे.
मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गणेश मूर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने त्या कृत्रिम हौदात विरघळणार नाहीत. त्यांना पुन्हा वाहत्या पाण्यात विसर्जन करावे लागेल; मात्र मुर्त्या पुन्हा बाहेर काढून विसर्जन केल्यास विटंबना होईल. हिंदू संस्कृतीत दोनदा विसर्जन करता येत नाही. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावेल. यासाठी बजरंग दलाचे 60 ते 70 स्वयंसेवक लाईफ जॅकेटसह याकामी कार्य करणार आहे. प्रत्येक प्रभागातून गणेश मूर्तींचे संकलन करून प्रवरा नदीपात्रात आणल्या तर त्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने पूजन करून नदीपात्रात विसर्जन करणार आहेत. त्यामुळे पालिकने कृत्रिम हौद तयार करणे थांबवावे. तसेच प्रवरा नदीपात्रातील पहिला घाट व प्रवरामाई घाट परिसरात बॅरिकेड्स लावण्यात यावे, सायंकाळी 5 वाजता लाईटचे फोकस, तहसिल कार्यालयातील लाईटचे बलून, सोबत नगरपालिका व काही पोलीस कर्मचारी विसर्जन ठिकाणी ठेवावे, आडवी नदीकडील रस्ता व धोकादायक ठिकाणे बंद करण्यात यावेत अशा मागण्या बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सचिन कानकाटे, सह.संयोजक कुलदीप ठाकूर, सह.मंत्री प्रशांत बेल्हेकर, संदीप वारे, सुरेश कालडा, अजिंक्य डोंगरे आदी कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.