‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील ‘सूत्रधारा’चा जामीन नामंजूर! जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; मुंबईतील आरोपीची मात्र सुटका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील पठारभागात राहणार्या एका एकोणावीस वर्षीय तरुणीला बोलण्याच्या बहाण्याने मंचरला बोलावून तिचे अपहरण, धर्मांतरण व निकाह केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले व आयाज अजिज पठाण या दोघांचेही जामीन अर्ज संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामुळे या दोघांनाही आता औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. तर, या दोघांसह अटकेत असलेल्या मुंबईच्या आदिल शब्बीर सय्यद याला मात्र सशर्त जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दीड महिन्यापूर्वी 26 जुलैरोजी दाखल झालेल्या या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी चौघांना अटक केली असून ‘त्या’ तरुणीला फसवून तिच्याशी बळजोरी निकाह करणार्या मुख्य आरोपीसह त्याला साथ देणारे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
दोन महिन्यांपूर्वी 07 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे सदरची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात संगमनेर तालुक्याच्या पठारावर राहणार्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला सूत्रधार युसुफ चौगुले याने घारगावमधील शादाब तांबोळी याच्यासोबत प्रेमसंबंध स्थापण्यासाठी भाग पाडले होते. मात्र महिन्याभरातच त्यांचा काडीमोड झाल्यानंतर पीडित मुलगी पुढील शिक्षणासाठी संगमनेरला येईपर्यंत काहीच घडले नाही. मात्र पीडितेने महाविद्यालयात प्रवेश घेताच शादाब तांबोळी याने कुणाल शिरोळेसोबत येवून तिला पुन्हा भुलवले व जवळच्या ‘कॅफे सेंटर’मध्ये नेवून तिच्याशी लगड करीत त्याची छायाचित्रे काढली व त्याचाच वापर करुन त्याने बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण केले.
पुढे पीडित मुलीने संगमनेरातील शिक्षण पूर्ण करुन पुणे जिल्ह्यातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. आरोपी शादाब तेथेही जात व पीडितेचा पाठलाग करीत. त्यातून एक दिवस त्यांच्यात भांडणे झाली, त्यावेळी तालुक्यात ‘लव्ह जिहाद’चा कीडा पाळू पाहणारा युसुफ चौगुलेही त्याच्यासोबत होता. मात्र पीडित मुलीने त्यावेळी हिम्मत करुन ‘पुन्हा त्रास दिल्यास पोलीस तक्रार करेल’ असा दम भरल्याने त्यांनी आपले प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र युसुफ चौगुलेला ही गोष्ट मान्य नसल्याने त्याने दुसरी योजना आखून 07 जुलैरोजी शादाबकरवी पीडित 19 वर्षीय तरुणीला बोलण्याच्या बहाण्याने मंचर (जि.पुणे) येथे बोलावले व त्यानंतर युसुफ चौगुलेच्या कारमधून बळजबरीने गुंगीचे औषध पाजून तिचे अपहरण करुन तिला मुंबईला नेण्यात आले.
तेथेही एकूण पाच जणांच्या मदतीने तीन दिवस पीडितेसह शादाब सानपाडा येथील एका लॉजवर थांबला. या दरम्यान त्याने दररोज पीडितेवर शारीरिक अत्याचारही केले. त्यानंतर 9 जुलैरोजी बांद्रा येथे नेवून तिचे बळजोरीने धर्मांतरण करुन शादाब तांबोळी सोबत तिचा निकाह लावण्यात आला. मात्र तो पर्यंत संगमनेर तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने घारगाव पोलिसांनी ‘त्या’ दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर करण्यासाठी युसुफ चौगुलेवर दबाव निर्माण केला व 10 जुलैरोजी दोघांनाही संगमनेरात आणण्यात आले. या दरम्यान पीडितेला नातेवाईकांशी काय बोलावे, पोलिसांना काय सांगावे याचे प्रशिक्षण देताना तसे न केल्यास तिच्यासह तिच्या कुटुंबाला मारुन टाकण्याची धमकीही देण्यात आली.
या संपूर्ण घटनाक्रमात पीडितेला मोठा मानसिक धक्का बसल्याने तिला संगमनेरात आणल्यानंतर जवळपास पंधरा दिवस तिच्यावर उपचार सुरु होते. त्यातून सावरल्यानंतर तिने 27 जुलैरोजी घारगाव पोलीस ठाण्यात वरीलप्रमाणे फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी युसुफ दादा चौगुले, शादाब तांबोळी, कुणाल शिरोळे, आदिल शब्बीर सय्यद व आयाज अजिम पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्याच दिवशी या प्रकरणाचा मास्टरमाईंड युसुफ चौगुले याच्या श्रीरामपूरातून मुसक्या आवळल्या. त्यानंतर 3 ऑगस्टरोजी साकूरमधील अमर पटेल याच्यासह मुंबईतील आदिल शब्बीर सय्यद व आयाज अजिज पठाण या दोघांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांनी संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
त्यावर सविस्तर सुनावणी झाली. यावेळी युक्तिवाद करताना सरकारी अभियोक्ता भानुदास कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करीत पसार आरोपींचा शोध, गुन्ह्यामागील हेतू अशा वेगवेगळ्या गोष्टी समोर करीत त्यांच्या जामीनाला विरोध केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले व आयाज अजिज पठाण या दोघांचा जामीनअर्ज फेटाळून लावला. मात्र त्याचवेळी या प्रकरणात मुंबईत आरोपींना मदत करणार्या आदिल शब्बीर सय्यद याला मात्र जामीनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित तरुणीला प्रेमपाशात अडकावणार्या शादाब तांबोळीसह त्याचा साथीदार कुणाल शिरोळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
संगमनेर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या ‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर प्रकरणाचा तपास करताना घारगाव पोलिसांकडून फारसे गांभीर्य पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पीडित मुलीला ती अवघ्या 15 वर्षांची होती तेव्हापासून त्रास देणारा आणि तिला प्रेमजालात अडकवणार्या शादाब तांबोळीसह वेळोवेळी त्याला साथ देणारा कुणाल शिरोळे याच्याबाबत अद्यापही पोलिसांना कोणताही मागमूस लावता आलेला नाही, यावरुन पोलीस या प्रकरणात किती गंभीर आहे हे सहज लक्षात येते.