तालुक्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला!

परिवर्तनानंतर धार्मिक कार्यक्रमात स्पर्धा वाढली

संगमनेर : गोरक्षनाथ मदने
संगमनेर विधानसभा मतदारसंघात गतवर्षी अनपेक्षित परिवर्तन घडल्यानंतर शहर व तालुक्यात यंदाचा नवरात्र उत्सव पूर्वीपेक्षा अधिक जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.  सत्ता परिवर्तनामुळे व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सणांमध्ये राजकीय रंग अधिक गडद झाल्याचे चित्र दिसून आले. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्याची स्पर्धा वाढली आहे.
तालुक्यात आणि शहराच्या विविध उपनगरांमध्ये दांडिया, गरबा, डीजे नाईट्स यांसारख्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण होतं. उत्सवांमध्ये सामाजिक व धार्मिक रंगांबरोबरच राजकीय स्पर्धा देखील ठळकपणे जाणवली. गणेशोत्सवापासूनच हे स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट झाले होते. मंडप सजावट, मिरवणुका, बक्षीस समारंभ आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या पोस्ट्स या सर्वांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये चढाओढ दिसून आली. नवरात्रोत्सवात तर या स्पर्धेने आणखी जोर धरला. अनेक ठिकाणी जाहीर कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, लाडू महाप्रसाद, अन्नदान आणि आरासबाज रोषणाई यांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 तालुक्याची राजकीय रचना खूपच गतिशील आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची तब्बल ४० वर्ष संगमनेर विधानसभा मतदारसंघावर व  तालुक्यावर मजबूत पकड होती. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची पकड सैल झाल्याने विधानसभा निवडणुकीत  उलथापालथ होऊन नवीन नेतृत्व  सत्तास्थानी आले आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात नवा उत्साह, नवी स्पर्धा आणि नव्या समीकरणांची चुणूक सण-उत्सवांमधूनही दिसून येत आहे. विद्यमान आ. अमोल खताळ, पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजित तांबे, अकोले विधानसभेचे आ. डॉ. किरण लहामटे आणि शिर्डी विधानसभेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आश्वी आणि जोर्वे गटामुळे जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचाही या भागात सक्रिय सहभाग वाढला आहे. त्यामुळे सध्या संगमनेर तालुका विविध राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे चर्चेत आहे.
यावर्षी झालेल्या विविध सणांमध्ये नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसला. तरुण वर्ग, महिला मंडळे, सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर पुढे आले. प्रत्येक गटाने आपली ताकद, कार्यक्षमता आणि जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने या उत्सवांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. संगमनेर बसस्थानक परिसर, उपनगरातील चौक, रस्ते मंडप, कमानींनी सजलेले होते. विविध राजकीय नेत्यांच्या शुभेच्छा फलकांमुळे संपूर्ण शहर राजकीय रंगात रंगलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावरही विविध गटांकडून आपापल्या कार्यक्रमांचे प्रचार आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.
आता दिवाळी सण समोर असून त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे सण-उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांमध्ये राजकीय उपस्थिती व स्पर्धा अजून अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे संगमनेर तालुक्यातील आगामी काळात राजकारणाचे तापमान वाढणार असून, प्रत्येक सण, प्रत्येक कार्यक्रम हा पक्षीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनू लागला आहे. त्यामुळे एकीकडे उत्सवांचे रंग अधिक गडद होत असताना, त्यात मिसळलेली राजकीय रंगतही सर्वसामान्य नागरिकांसाठी पाहण्यासारखी ठरत आहे.
Visits: 70 Today: 3 Total: 1109681

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *