हमीभावासाठी ज्ञानेश्वर कारखान्यावर गुरुवारी उपोषण ः मुरकुटे
![]()
नायक वृत्तसेवा, नेवासा
चालू गळीत हंगामासाठी केंद्र सरकारने उसाला हमीभाव जाहीर केल्याप्रमाणे तो भाव न देता ज्ञानेश्वर कारखान्याने 2100 रुपये भाव देऊन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार 2800 रुपये प्रतिटन मिळविण्यासाठी 1 जुलैला ज्ञानेश्वर कारखान्यावर उपोषण करणार असल्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीतासाठी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 10 टक्के साखर उतार असलेल्या उसाला हमीभाव म्हणून शेतकर्यांना 2800 रुपये प्रतिटन भाव दिला पाहिजे असे निर्देश दिले असताना उस उत्पादक शेतकर्यांना 2100 रुपये भाव देऊन बोळवण केली. उसाची एफआरपी कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकर्यांना न देता फसवणूक केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 1 जुलै, 2021 ला पहिले आंदोलन करणार असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. परंतु, शेतकरी दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच तोट्यात जात आहे. कारखान्याला साखर सोडून अन्य उपपदार्थांतून मोठा नफा मिळतो. मात्र, शेतकर्यांना असा कोणताही फायदा होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

