राजूरमध्ये खत खरेदीसाठी भर पावसात शेतकर्यांच्या रांगा
राजूरमध्ये खत खरेदीसाठी भर पावसात शेतकर्यांच्या रांगा
दूरवरुन आलेल्या शेतकर्यांच्या माध्यम प्रतिनिधींशी संतप्त प्रतिक्रिया
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असून शेतकरी खतासाठी राजूर येथे पहाटे चार वाजेपासून रांगा लावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिरपुंजे, धामणवन, मवेशी, कुमशेत, साकिरवाडी, सावरकुटे अशा चाळीस गावांतील सुमारे पाचशे शेतकरी राजूर येथील खताच्या दुकानाबाहेर खरेदीसाठी भर पावसात जमा झाल्याचे चित्र गुरुवारी (ता.20) मिळाले. मात्र केवळ 240 शेतकर्यांना पोलीस व कृषी सहाय्यकांच्या उपस्थितीत टोकण देण्यात आले. त्यामुळे उर्वरित शेतकर्यांना घरचा रस्ता धरावा लागला. याबाबत काही शेतकर्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

धामणवन येथील यशवंत भांगरे या शेतकर्याने आपण गेली आठ दिवस खतासाठी चकरा मारत आहोत असल्याचे सांगितले. भात रोपाला वेळेत खत मिळाले नाही तर भाताचे रोप खराब होतील. पर्यायाने पीक येणार नाही; अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आले असताना त्यात खत मिळत नसल्याने व मिळाले तर एखादी गोणी त्यात किती क्षेत्राला खत देणार असा यक्षप्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यामुळे उर्वरित शेतीचे करायचे काय असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे. यावर सरकारने तातडीने तोडगा काढून खते उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल. मायबाप सरकारने याचा विचार करून बांधावर नाहीच पण किमान चाळीस किलोमीटरवरून आलेल्या तेही पहाटे येऊन रांगेत उभ्या असलेल्या शेतकर्याला खते देऊन न्याय मिळावा, असेही भांगरे म्हणाले.

तर हनुमंता तुकाराम जाधव म्हणाले, मी पहाटे चार वाजता मवेशी येथून आलो आहे. रांगेत भर पावसात उभा असून केवळ 265 कार्ड देण्यात आली. हजारो माणसे फिरून गेली आहेत; मी गेली तीन दिवसांपासून चकरा मारत असून मला फक्त एक गोण मिळाली. निम्मी लागवड झाली उर्वरित शेतीला खते कुठून आणि कसे आणू असे म्हणाले. तर कुमशेत येथून आलेले शेतकरी पहाटे तीन वाजता येऊन रांगेत उभे राहिल्याचे सांगत होते. खताचा मोठा तुटवडा असून गरीब शेतकर्यांनी करायचे काय, दाद कुणाकडे मागायची असा सवालही शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी टेम्पो, दुचाकीवर भर पावसात राजूर येथे आले असून गावात चार दुकाने असूनही खत मिळणे मुश्किल झाले आहे. सकाळी सात वाजता आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला असता कृषी विभागाचे कुणीही भेटले नाही. दुकानदार सुनील मुंढे यांनी 265 शेतकर्यांना आम्ही टोकण दिले असून त्याप्रमाणे रांगेत वाटप चालू आहे. खताचा तुटवडा असून जितका माल आला तितका आम्ही देत आहोत. मात्र मागणी हजार शेतकर्यांची व पुरवठा फक्त 265 अशी स्थिती आमच्या प्रतिनिधीच्या समोर आली.

