ठराविक वेळेत दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या! राहाता शहरातील व्यापार्यांची पालिकेकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ धोरणांतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यामुळे छोट्या दुकानदारांची कोंडी झाली असून, शासनाने ठराविक वेळेत दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राहाता येथील व्यापार्यांनी शुक्रवारी (ता.8) पालिकेला निवेदनातून केली आहे.

याबाबत पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक नवनाथ जगताप व नगरसेवक डॉ.राजेंद्र पिपाडा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिनी लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक व व्यापार्यांमध्ये शासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. व्यापारी बाजारपेठ बंद राहिल्याने दुकानात, हातगाड्यांवर, छोट्या टपर्यांमध्ये काम करणारे कामगार व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक कोंडी झाल्याने प्रपंच चालवणे कठीण झाले आहे. सततच्या निर्बंधांमुळे बँकेची देणी, पालिकेची देणी, कर्जाचे हप्ते कसे द्यायचे असा सवाल व्यापार्यांनी केला आहे.

तत्पूर्वी शनिवार व रविवारच्या कडक लॉकडाऊनला आमचे सर्वतोपरी सहकार्य आहे. मात्र, इतर दिवशी ठराविक वेळेत दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. याबाबत चर्चा करुन मार्ग काढू असे आश्वासन प्रशासनाने व्यापार्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या निवेदनावर शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या स्वाक्षर्या आहेत.

जिल्ह्यात संगमनेर, कोपरगाव व राहाता तालुक्यात कोरोनाची मोठी लाट आहे. यामुळे राहाता शहरातील बाजारपेठ गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली आहे. यामुळे दुकानांत काम करणार्या कामगारांसह छोट्या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत व्यापारी सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन व्यापारी बांधवांना सहकार्य करावे, अशा प्रतिक्रिया व्यापार्यांनी दिल्या आहेत.
