‘लव्ह जिहाद’चा मास्टरमाईंड पुन्हा संगमनेर कारागृहात! संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाकडून जामीन रद्द; वरला न्यायालयाची प्रोडक्शन ऑर्डर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्यावर्षी घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मास्टरमाईड युसुफ दादा चौगुले तब्बल नऊ महिन्यानंतर जामीनावर बाहेर पडला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करताना ‘ट्रायल कोर्टाकडून’ निश्‍चित केल्या जाणार्‍या शर्थींचे पालन करण्याची अटही घातली होती. मात्र त्यानंतर अवघ्या 20 दिवसांतच 16 मे रोजी त्याने मध्यप्रदेशात जावून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी केल्याने तो वरला (जि.बडवाणी) पोलिसांच्या सापळ्यात अडकला. त्याच्यासह तिघांवर भारतीय शस्त्र कायद्यान्वये कारवाई झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी त्याचा जामीन रद्द करण्याबाबत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावरील सविस्तर सुनावणीनंतर न्यायालयाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन रद्द करीत त्याला तत्काळ न्यायालयीन कोठडीत घेण्याचे आदेश दिले होते. त्याची प्रत वरला न्यायालयात सादर केल्यानंतर आरोपीविरोधात प्रोडक्शन ऑर्डर जारी करण्यात आली असून घारगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेत संगमनेरच्या उपकारागृहात आणून डांबले आहे.


हिंदू मुलींना पे्रमपाशात अडकवून त्यांचे धर्मांतरण घडवून आणणार्‍या जिहादी टोळीचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले याने पठारभागातील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला हेरुन शादाब रशीद तांबोळी याच्याशी प्रेम करण्यास भाग पाडले. मात्र हा खेळ फार दिवस टीकला नाही. त्यानंतर सदरील मुलगी दहावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी संगमनेरात आल्यानंतर चौगुलेने पुन्हा या प्रकरणाला हवा देत शादाबकरवी तिच्याशी लगड करवून त्याची छायाचित्रे काढली व त्याचा वापर करुन पुन्हा त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण केले. वर्षभरानंतर पीडित मुलगी शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात गेली. त्यावेळी तिने शादाबसोबत असलेल्या प्रेमसंबंधांनाही तिलांजली देत त्याच्याशी नाते तोडले होते. मात्र जिहादचा कीडा डोक्यात घेवून तब्बल चार वर्ष केलेले प्रयत्न विफल होताना पाहून युसुफ चौगुलेच्या मनातील हिंसकवृत्ती जागली आणि त्याने तिचे अपहरण करुन आपली मनशा तडीस नेण्याचा निर्णय घेतला.


गेल्यावर्षी 7 जुलैरोजी पीडित 19 वर्षीय विद्यार्थीनीला शेवटचे बोलण्याच्या बहाण्याने मंचरच्या बसस्थानकावर बोलावण्यात आले. यावेळी युसुफच्या कारमध्ये बसलेल्या शादाबने पीडितेला गाडीत बसून बोलू असे सांगत तिला कारमध्ये बसण्याचा आग्रह केला. पुढे जावून युसुफने पाण्यात गुंगीचे औषध मिसळून वाहन बदलून तिला शादाबसह मुंबईला पाठवले. तेथे दोघांनी त्याला पूर्ण मदत करताना राहण्याची, धर्मांतरण करुन निकाह लावण्याची व्यवस्था केली. मात्र या प्रकरणाने संगमनेरात जातीय तणाव निर्माण झाल्याने तत्कालीन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी वेगाने तपासाची चक्र फिरवून या प्रकरणाचा मास्टरमाईड युसुफ दादा चौगुले याच्यावर दबाव निर्माण करुन दोनच दिवसांत 10 जुलैरोजी शादाबसह पीडितेला पोलिसांसमोर शरण येण्यास भाग पाडले.


मात्र दोन दिवसांच्या कालावधीत पीडितेवर असंख्य अत्याचार आणि धमक्यांचा वापर झाल्याने तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था ढासळलेली होती. त्यामुळे पोलिसांनी पीडितेला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देत तिच्यावर उपचार केले. 27 जुलैरोजी तिने घारगाव पोलिसांना दिलेल्या जवाबाबत संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर युसुफ दादा चौगुलेसह शादाब तांबोळी आणि त्यांना मदत करणार्‍या अन्य चारजणांवर पोक्सोसह, अपहरण, अत्याचार, धमक्या, मारहाण, बळजबरीने धर्मांतरण अशा वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल करीत त्याच दिवशी रात्री प्रकरणाचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला श्रीरामपूरातून अटक केली. तेव्हापासून तो संगमनेरच्या उपकारागृहात खितपत होता. या दरम्यान त्याने संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासह छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाकडेही जामीनासाठी दाद मागितली, मात्र ती फेटाळण्यात आली.


त्यानंतर त्याने गेल्या फेब्रुवारीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत जामीन देण्याची विनंती केली. त्यावरील सविस्तर सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्रायल कोर्टाला’ जामीनाच्या शर्थी निश्‍चित करण्याचे आदेश देताना कोणत्याही माध्यमातून त्याचे उल्लंघन टाळण्याची तंबी देत 22 एप्रिलरोजी चौगुलेचा जामीनअर्ज मंजूर केला. मात्र त्यानंतर अवघ्या 20 दिवसांतच 16 मे रोजी मध्यप्रदेशातील वरला पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो आणि त्याच्यासह अन्य दोघे अडकले. या तिघांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकाराने चौगुलेकडून जामीनासाठीच्या शर्थीचेही उल्लंघन झाल्याने घारगाव पोलिसांनीही संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज करुन युसुफ दादा चौगुले याचा मध्यप्रदेशातील कारनामा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर बचावपक्षाला नोटीस बजावून दोन्ही बाजूची सुनावणी घेतल्यानंतर गेल्या महिन्यात जिल्हा न्यायाधिश दिलीप घुमरे यांनी युसुफ चौगुले याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द केला होता.


या दरम्यान मध्यप्रदेश पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपीचा तेथील दाखल गुन्ह्यातील अटकेचा कालावधी संपण्यापूर्वीच घारगाव पोलिसांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि पूर्वीच्या प्रकरणातील दस्तावेज वरला न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने प्रोडक्शन ऑर्डर जारी केली. त्यानुसार आरोपीची वरला कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याला घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी पुन्हा एकदा संगमनेरच्या उपकारागृहात करण्यात आली आहे.


गेल्यावर्षी पठारभागात घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या या प्रकरणाने मोठा जातीय तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर घारगावचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर यांच्या पथकाने त्याच दिवशी रात्री मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले याच्या श्रीरामपूरात जावून मुसक्या आवळल्या. तर, नंतरच्या तपासात मुंबईतील एकासह साकूरच्या एकाला अटक होवून त्यांची सुटकाही झाली. या प्रकरणात मुलीला प्रेमप्रकरणात फसवणार्‍या शादाब रशीद तांबोळीसह त्याचा साथीदार कुणाल शिरोळे व आयाज पठाण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

Visits: 504 Today: 1 Total: 1425485

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *