धरणांच्या पाणलोटात मान्सूनला ‘बळ’ चढले! रतनवाडीत साडेसहा इंच पाऊस; भंडारदर्यातून चार हजार क्यूसेकचा विसर्ग..

नायक वृत्तसेवा, अकोले
विठू नामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर असलेल्या हजारों पालख्या भिमेच्या वाळवंटी विसावत असताना अपेक्षेप्रमाणे राज्यात मान्सूनच्या परतीचे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या 48 तासांत सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून राज्यातील बहुतेक धरणांची स्थिती समाधानकारक आहे. एकीकडे धरणांच्या पाणलोटात कमी-अधिक पाऊस असताना दुसरीकडे राज्यात मात्र त्याने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट उभे राहीले आहे. अशा स्थितीत पाणलोट क्षेत्रातील पावसाला जोर चढण्यासह लाभक्षेत्रातही तुरळक सरींसह मान्सूनच्या पुनरागमनाची वर्दी मिळाल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तासांत अहिल्यानगर जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाला असून रतनवाडीत तब्बल साडेसहा तर, घाटघरमध्ये सहाइंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाचा शिल्लक कालावधी विचारात घेवून भंडारदर्याचा वक्राकृती सांडवा उचलण्यात आला असून वीज प्रकल्पासह एकूण 3 हजार 949 क्यूसेकचा विसर्ग सोडला जात आहे. सध्या भंडारदर्याचा पाणीसाठा 69 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मागील पंधरवड्यापासून कोकण वगळता राज्यातील पाऊस जवळजवळ थांबला आहे. पहिल्या टप्प्यात समाधानकारक बरसणार्या मान्सूनच्या भरवशावर बहुतेक भागातील पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर पाणी देण्याची वेळ टळून गेल्यानंतरही आकाशात केवळ दाटी करुन असलेल्या ढगांमधून पाणीच गळत नसल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. एकीकडे जूनमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यासह राज्यातील बहुतेक धरणांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे सुरुवातीच्या पावसावर भरवसा ठेवून पेरण्या केल्यानंतर पावसाने प्रदीर्घकाळ पाठ फिरवल्याने अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचेही संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून विठू नामाचा गजर करीत भागवत परंपरेची पताका घेवून पंढरीत पोहोचलेला बळीराजा पावसाचा आशीर्वाद मागत आहे. त्याचा परिणामही आता दिसू लागला असून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसामध्ये गेल्या चार नक्षत्रांपासून सातत्याने वाढ होण्यासह लाभक्षेत्रातील वातावरणही अधिक गडद होत असल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाला ‘बळ’ चढले असून आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडीत जुलैतील पहिला विक्रम नोंदवला गेला आहे. अमृतवाहीनीच्या ऊगमस्थानी गेल्या 24 तासांत तब्बल 166 मिलीमीटर (साडेसहा इंच) पाऊस झाला आहे. त्या खालोखाल घाटघरमध्येही 148 मिलीमीटर (सहा इंच) पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे भंडारदर्यातील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारी (ता.4) पहाटेपासूनच पाणलोटात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस वाढल्याने सुरक्षितता म्हणून भंडारदरा धरण व्यवस्थापनाने सायंकाळी सहा वाजता धरणाचा वक्राकृती सांडवा उचलून त्याद्वारे 3 हजार 104 क्यूसेकने तर, विद्युत प्रकल्पासाठी 845 क्यूसेक अशा एकूण 3 हजार 949 क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळपर्यंत त्यात सातत्य असून निळवंड्यातून सोडण्यात येणारा विसर्ग मात्र नऊशेवरुन सहाशे क्यूसेक करण्यात आला आहे.

गेल्या चोवीस तासात भंडारदरा धरणात 438 दशलक्ष घनफूट पाणी दाखल असून धरणातून सोडलेले पाणी निळवंड्यात अडवले जात असल्याने या धरणातही तब्बल 426 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाच्या पाणलोटातही पावसाला जोर चढला असून हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर पावसाचे धुमशान सुरु झाल्याने कोतुळनजीकचे मुळापात्र पुन्हा विस्तारत आहे. आज सकाळी सहा वाजता येथिल पात्रातून 4 हजार 429 क्यूसेकने धरणाकडे पाणी वाहत होते. तालुक्यातील आढळा व भोजापूर ही दोन्ही जलाशये यापूर्वीच तुडूंब भरली असून सध्या आढळा धरणाच्या सांडव्यावरुन नदीपात्रात 198 क्यूसेक तर, भोजापूर धरणाच्या भिंतीवरुन म्हाळुंगी नदीपात्रात 38 क्यूसेकचा प्रवाह सुरु आहे. यंदाच्या वर्षी जुलैच्या सुरुवातीलाच या दोन्ही नद्या प्रवाहीत झाल्याने लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत झालेला पाऊस : रतनवाडी 166 मि.मी., घाटघर 148 मि.मी., पांजरे 86 मि.मी., भंडारदरा 70 मि.मी., निळवंडे 15 मि.मी. आणि अकोले 11 मि.मी. धरणातील पाणीसाठे : मुळा 15 हजार 16 दशलक्ष घनफूट (57.75 टक्के), भंडारदरा 7 हजार 583 दशलक्ष घनफूट (68.69 टक्के), निळवंडे 5 हजार 88 दशलक्ष घनफूट (61.15 टक्के), आढळा दशलक्ष घनफूट (ओव्हर-फ्लो) व भोजापूर 361 दशलक्ष घनफूट (ओव्हर-फ्लो).

पर्यटकांचे आकर्षण रौद्र स्वरुपात!
निसर्गाचे वरदान लाभलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटासोबतच पर्यटकांना रंधा फॉलचे विक्राळ स्वरुपही प्रचंड भावते. त्यामुळे भंडारदर्यात पर्यटनासाठी येणारा बहुतेकजण शेंडीपासून दहा किलोमीटर दूर असूनही या ठिकाणाला भेट दिल्याशिवाय माघारी जात नाही. अर्थात निळवंडे धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यास सुरुवात झाल्यापासून या फॉलचे आयुष्य मर्यादीत झाले आहे. मात्र तो पर्यंत त्याचे विक्राळ स्वरुप न्याहाळणार्यांची संख्याही कधीच आटत नाही. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाला जोर वाढल्याने धरणाची पाणीपातळी नियंत्रित केली जात आहे. त्यासाठी शुक्रवारी सायंकाळपासून धरणातून चार हजार क्यूसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. कळसूबाईच्या शिखरांवरही आषाढसरींनी जोर धरल्याने कृष्णवंती आवेगाने वाहू लागली आहे. त्याचा परिणाम वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन एक हजार 22 क्यूसेकचा ओव्हरफ्लो त्यात मिसळून जवळपास पाच हजार क्यूसेकने पाणी वाहत असल्याने रंधा धबधबा भलताच जोशमध्ये आला आहे. प्रचंड आवाज करीत जवळपास पन्नास फूट खोल दरीत फेसाळत कोसळणारा हा फॉल बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली असून खाली उतरणार्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अधुनमधून आषाढसरीही कोसळत असल्याने पर्यटक बेधुंद होवून नाचतानाही दिसत आहे. सततच्या पावसाने दगडांवर शेवळ साचत असल्याने पर्यटनाचा आनंद घेताना सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. फोटो अथवा सेल्फीच्या नादात पाण्याच्या प्रवाहात अथवा डोंगरांच्या कड्यावर उभे राहण्याचा मोह टाळला पाहीजे.

