पन्नास लाखांच्या सेंद्रीय औषधांची केली परस्पर विक्री
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पिंपळस येथील ‘अमेरिकन फेट्रो केम ऑरगॅनिक’ सेंद्रीय औषध निर्मिती करणार्या कंपनीच्या गोडावूनमधून व्यवस्थापक व तीन कामगारांनी कंपनीचे मालक सचिन मनोहर पाटोळे यांना कुठलीही कल्पना न देता सेंद्रीय औषधांचे 50 लाख 34 हजार 414 रुपयांच्या किंमतीच्या 514 बॉक्सची परस्पर विक्री करून फसवणूक केली आहे.
पिंपळस येथे रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून दत्तात्रय किसन राजभोज (रा. कोल्हार) यांची नियुक्ती सन 2018 साली केली होती. मॅनेजर राजभोज याने मालकाचा चांगला विश्वास संपादन केला. त्यामुळे गोडावूनची चावी व संपूर्ण व्यवहार तो पाहत होता. त्यानंतर त्याने कुठलीही परवानगी न घेता मंगेश मच्छिंद्र बोराडे (रा. कोल्हार), मंगेश केसरकर (रा. ममदापूर) व गणेश तेलोरे (रा. वाकडी) या तिघांची कंपनीमध्ये न विचारता नेमणूक केली. दरम्यान, 1 जुलैला मालकाने पिंपळस येथील गोडावूनमध्ये कंपनीच्या साठवलेल्या मालाची पाहणी केली असता, विक्री करून शिल्लक असलेल्या मालाची मला मोठी तफावत आढळून आली. याबाबत मॅनेजर दत्तात्रय राजभोज व तिघा कामगारांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने कंपनीची नॅचरल केल्प, अशियन फीड, फयूल, प्रोव्होक, यूजिफॉर्स या सेंद्रीय औषधांचे 514 बॉक्स परस्पर विक्री केल्याचे आढळून आले. या प्रकरणी मालक सचिन पाटोळे यांनी राहाता पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वरील चौघांविरोधात भादंवि कलम 408, 418, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत कंडारे हे करत आहे.