आम्ही कसेही जगू पण पोराबाळांचे काय?
आम्ही कसेही जगू पण पोराबाळांचे काय?
पेठेवाडी ग्रामस्थांनी वैभव पिचडांसमोर मांडल्या व्यथा
नायक वृत्तसेवा, अकोले
‘सायब, आम्ही गरिबांनी काय करावं कसं जगावं? अगोदरच कोरोना त्यात अस्मानी संकट; रोजगार नाही हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. हातात पैका नाही अन् रेशनचे दाणे संपून चार महिने झाले. जंगलातील कंदमुळे खावीत, तर तीही रानडुकरांनी फस्त केली. आम्ही कसेही जगू पण पोराबाळांचे काय,’ अशा शब्दांत पेठेवाडी येथील ग्रामस्थांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्यासमोर व्यथा मांडली. त्यामुळे व्यथित झालेल्या पिचड यांनी तहसीलदारांशी तात्काळ संपर्क साधून प्रश्न सोडवा नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

कोरोना महामारीने गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्यातील ठिकठिकाणच्या ग्रामस्थांना त्रस्त केले आहे. रोजगार नाही, भातपीक नष्ट झाले. त्यातच तीन महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळत नाही. तालुका प्रशासन लक्ष देत नसल्याने पेठेवाडी ग्रामस्थांनी 25 किलोमीटरची पायपीट करीत राजूरला येऊन पिचड यांची भेट घेत समस्या मांडल्या. जी अवस्था पेठेवाडीची तीच कुमशेत, पाचनई, भोजदरी, ठाकरवाडीची. स्वस्त धान्य दुकानदार धान्य देत नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले असल्याची हकीगत सांगितली.

