‘टू प्लस’ सिस्टीम वापरून गुन्हेगारांवर कारवाई होणार ः पाटील
‘टू प्लस’ सिस्टीम वापरून गुन्हेगारांवर कारवाई होणार ः पाटील
नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील वाळूतस्कर, शरीर व माला विरुद्धचे गुन्हेगार यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध ‘टू प्लस’ सिस्टीम वापरून गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंगळवारी (ता.27) सायंकाळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राहुरी पोलीस ठाण्यातील कामकाजाचा आढावा घेतला. राहुरीचे कारागृह, ठाणे अंमलदार यांची नोंदवही, वायरलेस यंत्रणा आदिंची त्यांनी पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी, उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक मसूद खान उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, जिल्ह्यातील वाळूतस्कर, शरीर व माला विरुद्धचे गुन्हेगार यांची माहिती महिनाभरात संकलित होईल. तोपर्यंत त्यांच्यावर काय कारवाई करायची, पुढच्या वेळी एखादा गुन्हा केला तर, काय कारवाई करणे आवश्यक आहे. याचे नियोजन केले जाईल. यालाच ‘टू प्लस’ सिस्टीम म्हणतात. गुन्हेगारी व गुन्हेगारांचे उच्चाटन करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.
चिखलठाण येथे पोलीस कर्मचारी वरिष्ठांसाठी वाळूतस्करीचा हप्ता वसुली करताना पैशांची मागणी करीत असल्याचा व्हिडिओ, त्याबद्दल पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण केकाण यांच्याविरुद्ध तक्रार अर्जाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडिओची सत्यता पडताळून, तथ्य आढळले. तर, संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.
– मनोज पाटील (पोलीस अधीक्षक, अहमदनगर)