ग्रामीणभागातील रुग्णगतीने घेतली काहीशी उसळी..!

ग्रामीणभागातील रुग्णगतीने घेतली काहीशी उसळी..!
शहराला दिलासा मिळण्याचे सत्र कायम, मात्र ग्रामीणभागाने चिंता वाढवली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील दोन दिवस शहरासह ग्रामीण रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र दिसल्यानंतर मंगळवारी (ता.27) ग्रामीण रुग्णसंख्येने पुन्हा काहीशी उसळी घेतली. शनिवार, रविवार आणि त्यात दसरा यामुळे कोविड चाचण्या करणार्‍या सर्वच घटकांनी दीर्घकाळानंतर सुट्टी घेतल्याने मागील दोन दिवसांत समोर येणारी रुग्णसंख्या खालावली होती. मात्र मंगळवारी खासगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या अहवालातून तालुक्याच्या रुग्णगतीची सरासरी पुन्हा पूर्वगतीवर आली असून मंगळवारी शहरातील चौघांसह जणांसह एकूण 40 रुग्ण समोर आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 4 हजार 157 झाली आहे.

सप्टेंबरमध्ये दीड हजारांहून अधिक रुग्णांची भर घालणार्‍या कोविडचा ऑक्टोबर सुरू होताच काहीसा वेग मंदावला. चालू महिन्यातील सुरुवातीच्या दहा दिवसांचा विचार करता गेल्या महिन्यातील दररोज 52 रुग्ण वाढण्याचा वेग कमी होवून तो 47.3 रुग्ण प्रति दिवसावर खाली आला होता. त्यातही शहरी संक्रमणात अगदी सुरुवातीपासूनच घट नोंदविली गेल्याने पहिल्या दहा दिवसांत शहरात सरासरी 9.4 गतीने केवळ 94 रुग्ण, तर ग्रामीणभागात 37.9 च्या गतीने तब्बल 379 रुग्णांची भर पडली.

नंतरच्या दहा दिवसांत तालुक्याच्या रुग्णवाढीचा वेग बराच कमी होवून तो 26.5 झाल्याने 11 ते 20 ऑक्टोबर दरम्यान तालुक्यातील रुग्णसंख्येत 265 रुग्णांची भर पडली. यात शहरातील 64 तर ग्रामीण भागातील 201 रुग्णांचा समावेश होता. नंतरच्या सात दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्या आणखी कमी होवून 24.57 रुग्ण दररोज या वेगाने 172 जणांची भर पडली. यातही शहरात दररोज तीन रुग्ण तर ग्रामीण भागात दररोज 21 रुग्ण समोर आले. 1 ते 27 ऑक्टोबर या कालावधीचा विचार करता या सत्ताविस दिवसांत तालुक्यातून सरासरी 33.70 वेगाने एकूण 910 रुग्ण समोर आले. यात शहरीभागातून अवघ्या 6.66 वेगाने 180 तर ग्रामीण क्षेत्रात सरासरी 27 वेगाने तब्बल 730 रुग्णांना संक्रमण झाल्याचे समोर आले. हा सिलसिला अजूनही सुरुच असून मंगळवारी शहरीभागाच्या तुलनेत ग्रामीणभागातील संक्रमणाची गती अधिक असल्याचे दिसून आले.

मंगळवारी (ता.27) रात्री उशीराने रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे 34 तर खासगी प्रयोगशाळेचे सहा असे एकूण 40 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून शहरातील शिवाजीनगर परिसरातील 38 वर्षीय तरुण, साईनगरमधील 36 वर्षीय महिला व मालदाड रस्त्यावरील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय महिलेला कोविडची लागण झाली. मंगळवारी तालुक्याच्या ग्रामीणभागातील रुग्णगतीत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. तब्बल पंधरा दिवसांनंतर तालुक्यात पुन्हा चाळीस रुग्ण समोर आले. यापूर्वी 13 ऑक्टोबर रोजी 42 रुग्ण समोर आले होते, त्यात शहरी 14 तर ग्रामीण 28 जणांचा समावेश होता.

मंगळवारच्या अहवालातून तालुक्यातील जोर्वे, घुलेवाडी, निमोण, गुंजाळवाडी, आश्वी बु. व खांडगावमधून तीनपेक्षा अधिक रुग्ण समोर आले. खांडगावमधील 80 वर्षीय वयोवृद्धासह 30 वर्षीय तरुण, 75 व 55 वर्षीय महिला, आश्वी बु. मधील 45, 42 व 16 वर्षीय महिलांसह 36 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 29 वर्षीय तरुण, 55, 37 व 30 वर्षीय महिला, गुंजाळवाडी शिवारातील 40 वर्षीय दोघा तरुणांसह शिवारातील बटवालमळा येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व गोल्डन सिटीतील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडी येथील 52, 46, 28 व 25 वर्षीय इसमांसह 44 वर्षीय महिला, समनापूर येथील 55 वर्षीय महिलेसह 37 व 35 वर्षीय तरुण, निमोण येथील 40 वर्षीय तिघा महिलांसह 21 वर्षीय तरुण, हंगेवाडी येथील 40 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 45 वर्षीय तरुण, राजापूर येथील 24 वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 39 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 35 वर्षीय महिला व पिंपळगाव कोंझिरा येथील 72 वर्षीय ज्येष्ठाला कोविडचे संक्रमण झाले आहे. मंगळवारच्या अहवालातूनही शहरी रुग्णसंख्येतील घट कायम राहिली, मात्र ग्रामीण भागातील रुग्णगतीत काहिशी वाढ झाल्याचे दिसून आले. मोठ्या कालावधीनंतर तालुक्याच्या रुग्णसंख्येत चाळीस रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या आता 4 हजार 157 वर पोहोचली आहे.

अकोल्यातील रुग्णगतीतही झाली घट..
संगमनेर पाठोपाठ अकोले तालुक्यातील रुग्णगतीतही गेल्या काही दिवसांपासून घट नोंदविली गेली आहे. त्यामुळे अकोलेकरांमध्येही काहीसे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी तालुक्यातील सहा जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. यात शहरातील एका व्यापार्‍याचा समावेश आहे. प्रशासनाने मंगळवारी शहर व तालुक्यातील 44 जणांच्या रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारा स्राव चाचण्या केल्या. त्यातून अवघ्या 9 टक्के वेगाने चार जणांच्या तर खासगी प्रयोगशाळेकडून दोघांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत सहा जणांची भर पडून एकूण रुग्णसंख्या 2 हजार 186 झाली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालातून ब्राम्हणवाडा येथील 35 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महीला, समशेरपूर शिवारातील (नागवाडी) येथील 30 वर्षीय महीला, कोतुळ मधील 25 व 23 वर्षीय तरुण व शहरातील बाजारपेठेतून 35 वर्षीय तरुण व्यापार्‍याचा अहवाल संक्रमित असल्याचा मिळाला आहे.

Visits: 6 Today: 2 Total: 30767

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *