विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल! मालट्रक घेण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून सुरू होता छळ
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मालट्रक घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी लग्नापासून शारीरिक व मानसिक छळ सोसणार्या घुलेवाडीतील विवाहितेने रविवार गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मयतेच्या भावाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी मयत शाहीन मोहसीन शेख हिचा हुंड्यासाठी छळ करणे व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती मोहसीन याच्यासह सासू व नणंदेवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घुलेवाडीत राहणार्या वाळुंज (जि.औरंगाबाद) येथील शाहीनचा शेख तरुणीचा 2013 साली संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील मोहसीन रमजान शेख याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती मोहसीनसह जरीना रमजान शेख व आस्मा रमजान शेख यांनी मालट्रक घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत या कारणासाठी शाहीनचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. आपले आई-वडील गरीब आहेत, मजूरी करुन पोट भरीत असल्याने त्यांच्याकडे इतके पैसे नाहीत असे वारंवार सांगूनही तिच्यावरील अत्याचारात गेल्या आठ वर्षात कोणताही फरक पडला नाही.

दररोजच्या भांडणांना आणि शारीरिक व मानसिक छळाला कंटाळलेल्या शाहीन यांनी अखेर शेवटा पर्याय निवडला आणि त्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घुलेवाडीतील आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी संगमनेरात आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी मयतेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचे सांगत घातपाताचा संशय व्यक्त केला. शवविच्छेदनानंतर शहर पोलिसांनी मयतेचा भाऊ युनुस रज्जाक शेख यांच्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या 306 कलमासह हुंड्यासाठी छळ करणे 498 (अ), मारहाण करणे 323, शिवीगाळ व धमकी देणे 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक जाणे यांच्याकउे देण्यात आला आहे.
