सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती देणं पोलिसांना भोवलं! आमदार अमोल खताळ यांचा औचित्याचा मुद्दा; पोलीस उपाधीक्षकांसह निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार पोलीस कारवाया होवूनही गेल्या दहा वर्षांपासून सुरुच असलेल्या संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यांनी मंगळवारी विधानसभेचे सभागृह गाजवले. आमदार अमोल खताळ यांनी या विषयावर शासनाचे लक्ष वेधले होते. त्यावरील उत्तरात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या सहा महिन्यात संगमनेर पोलिसांनी केलेल्या कारवायांची माहिती देताना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (एम.पी.डी.ए) देखील एक कारवाई झाल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र गेल्या दहा वर्षात संगमनेर शहरात शेकडोवेळा छापे पडल्यानंतरही आजवर कोणत्याही गुन्हेगारी टोळीवर अशा प्रकारची कारवाई झालेली नाही. मात्र याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे प्रलंबित आहे. असे असतानाही सभागृहात दिलेली माहिती प्रत्यक्ष कारवाई केल्याचे सांगणारी असल्याने त्यातून सभागृहाची आणि पर्यायाने शासनाची दिशाभूल केली गेली. हाच मुद्दा उपस्थित करुन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी आज सभागृहाचे कामकाज सुरु होताच औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून संगमनेरात सुरु असलेले बेकायदा गोवंश कत्तलखाने गेल्या दहा वर्षात गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे वारंवार चर्चेत आहेत. येथील कत्तलखान्यातून मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करुन त्यांचे मांस मुंबई, मालेगाव, छत्रपती संभाजी नगरसह कर्नाटकातील गुलबर्गा आणि दक्षिणेतील हैदराबादपर्यंत पोहोचविले जाते. या संपूर्ण उद्योगात पद्धतशीर साखळी कार्यरत असल्याने आजवर वारंवार झालेल्या कारवायानंतरही संगमनेरचे कत्तलखाने कधीही बंद होऊ शकले नाहीत. या मुद्द्यावरुन यापूर्वी संगमनेरात अनेकवेळा सामाजिक सौहार्दाचे वातावरण खराब होऊन जातीय तणावाचीही परिस्थिती निर्माण झाली होती. याशिवाय या बेकायदा उद्योगाला पोलिसांचे पाठबळ असल्याचा थेट आरोप करीत हिंदुत्ववादी संघटनांनी चक्क पोलिसांच्या विरोधातही आंदोलनाची भूमिका घेतली होती. या सर्व घडामोडीनंतरही संगमनेरच्या बेकायदा कत्तलखान्यांवर मात्र या सगळ्यांचा कोणताही परिणाम झाल्याचे आजवर बघायला मिळाले नाही, त्यामुळे पोलिसांविषयी सर्वसामान्यांमध्ये रोष खदखदत होता.

संगमनेर विधानसभेत परिवर्तन घडल्यानंतर इतिहासात बहुधा पहिल्यांदाच संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी हजारोंची श्रद्धा असलेल्या गोवंशाच्या हत्येचा विषय मंगळवारी थेट सभागृहात उपस्थित केला. यावेळी आपली लक्षवेधी मांडताना आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरचे कत्तलखाने, त्यावरील पोलिसांच्या वारंवार होणाऱ्या कारवाया आणि त्यानंतरही पुन्हा घडणाऱ्या घटना असा सविस्तर घटनाक्रम सांगताना शासन लोकांच्या श्रद्धेला महत्त्व देणार आहे की नाही असा परखड सवालही सभागृहाच्या माध्यमातून पटलावर ठेवला. मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगमनेरच्या कत्तलखान्यांच्या विषयावर उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना एक जानेवारी ते 12 जून 2025 या कालावधीत संगमनेर शहर पोलिसांनी 44 कारवाया केल्याचे सांगत त्याबाबतची विस्तृत माहिती पटलावर ठेवली. त्यासोबतच गृहमंत्र्यांनी संगमनेर पोलिसांनी कसायांच्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (एम.पी.डी.ए) एक कारवाई झाल्याची माहितीही सांगितली. मात्र संगमनेर शहरातील गोवंश कत्तलखान्यांच्या इतिहासात अशा प्रकारची कोणतीही कठोर कारवाई झाल्याचे आजवर समोर आलेले नाही.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर आमदार अमोल खताळ यांनी त्यांची भेट घेत एम.पी.डी.ए नुसार कारवाई झालेली नसल्याचे, मात्र त्याबाबतचा केवळ प्रस्ताव पोलीस अधीक्षकांच्या दप्तरी मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सदरचा विषय गंभीर असल्याची गोष्ट मान्य करीत गृहमंत्री फडणवीस यांनी मंगळवारीच चुकीची माहिती देणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार आज (ता.2) सकाळी सभागृहाचे कामकाज सुरु होताच आमदार अमोल खताळ यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचे लक्ष संगमनेरच्या कत्तलखान्यांकडे वेधले. यावेळी त्यांनी मंगळवारी गृहमंत्र्यांनी संगमनेरात संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार झालेल्या कारवाईबाबत चुकीची माहिती दिल्याचे सभागृहाला सांगितले. यावेळी त्यांनी अशाप्रकारे राज्याच्या प्रमुखांना अंधारात ठेवून खोटी माहिती देणाऱ्या पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे व शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख या दोघांचेही तत्काळ निलंबन करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार खताळ यांच्याकडून या विषयावर सभागृहाला माहिती दिली जात असताना मुख्यमंत्री अथवा गृह विभागाकडून कोणीही हजर नसल्याने याबाबतचा निर्णय समोर आलेला नाही. मात्र आमदार खताळ यांच्या सलग दुसऱ्या दिवसाच्या भूमिकेने संगमनेरातील या दोन्हीही पोलीस अधिकाऱ्यांचे भवितव्य मात्र अधांतरीत झाले आहे.

संगमनेरचे गोवंश कत्तलखाने आणि पोलिसांची भूमिका नेहमीच संशयित राहिली आहे. चार वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2021 रोजी अहमदनगर पोलिसांनी भारतनगर परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी कारवाई करताना तब्बल 31 हजार किलो कापलेल्या मांसासह सव्वाकोटीहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी नवाज जावेद कुरेशी नामक कसायाच्या कत्तलखान्यात तीन वेगवेगळ्या रंगाच्या डायऱ्याही धाड पथकाच्या हाती लागल्या होत्या. त्यात संगमनेरच्या कसायांकडून सदरचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी वाटल्या जात असलेल्या खैरातीचा संपूर्ण हिशोब मांडण्यात आला होता. त्यात अहिल्यानगरपासून स्थानिक पोलिसांपर्यंत आणि राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांपासून पत्रकारांपर्यंत अनेक लाभार्थ्यांची नावे होती. मात्र नंतरच्या तपासात सदरच्या डायऱ्या गायब झाल्याने संगमनेरच्या कत्तलखान्यांमागील ‘गुढ’ वाढले आहे.

Visits: 364 Today: 4 Total: 1103168
