चक्क कोविड रुग्णांवर उपचार करीत होता ‘मुन्नाभाई’! 2007 सालच्या बोगस यादीतील मुन्नाभाईला शोधण्यास लागली तब्बल 14 वर्ष..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे कोविडच्या वाढत्या संक्रमणाचा फायदा घेऊन अनेक ठिकाणांची रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याच्या बातम्या धडकत असताना, आता बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर ‘धंदा’ मांडून बसलेल्या मुन्नाभाईंंचीही मोठी चलती असल्याचे समोर आले आहे. हे सिद्ध करणारा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथेे घडला आहे. येथील एका मुन्नाभाईने चक्क ‘कोविड’ रुग्णांवरच उपचार सुरू केले होते. तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर आज दुपारच्या वेळी त्यांनी या मुन्नाभाईच्या क्लिनिकवर छापा घातला. प्रसंग ओळखून मुन्नाभाई पसार झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी आता सांगत असले तरीही ‘हेे’ दोघेही बराच वेळ सोबत असल्याची दैनिक नायककडे खात्रीलायक माहिती आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी तालुक्यातील आरोग्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळपासूनच दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी ठिकठिकाणच्या विलगीकरण केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणीही केली. याच दरम्यान त्यांचा ताफा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण समोर येत असलेल्या निमगाव भोजापूर या गावात पोहोचला. तेथील परिस्थितीची व व्यवस्थेची माहिती घेण्याचे काम सुरू असतानाच गावातील शैलेश किसन कडलग या नावाचा कोणी डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती त्यांना समजली.

गावात आलोच आहोत तर सदरचे क्लिनिकही पाहू असा विचार करून अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली. यावेळी संबंधित डॉक्टरच्या बोलण्यावरून स्वतः डॉक्टर असलेल्या प्रांताधिकारी मंगरुळे यांना संशय आल्याने त्यांनी त्या रुग्णालयाच्या परवान्यासह डॉक्टरच्या शिक्षणाची प्रमाणपत्रे विचारली. त्यातून जे सत्य समोर आले ते पाहून अधिकारीही चक्रावले. संबंधित इसम कोणतीही वैद्यकीय पदवी धारण न करता चक्क ॲलोपॅथी पद्धतीने कोविड रुग्णांवर उपचार करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.मंगरूळे यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली. आता आपलं काही खरं नाही असं लक्षात येताच संबंधित मुन्नाभाईने तेथून जी धूम ठोकली ती अधिकारी जाईपर्यंत..

याबाबत सायंकाळी प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांना सदर मुन्नाभाईवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकार्यांसह तालुका पोलिस ठाण्याचे पथक निमगाव भोजापूरच्या दिशेने रवाना झाले असून काही वेळातच संबंधित मुन्नाभाईच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शैलेश किसन कडलक या बोगस डॉक्टरचे नाव सन 2007 सालच्या बोगस डॉक्टर शोध यादीत नमूद आहे. त्यावरून सदर मुन्नाभाईचा शोध घेण्यास प्रशासनाला तब्बल 14 वर्ष लागली आहेत हे विशेष. या वृत्ताने वैद्यकीय क्षेत्राची घोंगडी पांघरून वाहत्या गंगेत आंघोळी करून घेणाऱ्या मुन्नाभाईंचे धाबे दणाणले आहेत.

Visits: 91 Today: 1 Total: 1105720
