श्रीरामपूरच्या कारागृहातील 19 कैद्यांची नाशिक रोडसह येरवड्यात रवानगी! बंदी क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाल्याने गुन्ह्याचे स्वरुप पाहून केले स्थलांतर

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील दुय्यम कारागृहात ठेवलेल्या विविध गुन्ह्यांतील 19 कैद्यांची नुकतीच नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासह येरवडा (पुणे) येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. येथील कारागृहाची बंदी क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाल्याने जिल्हा न्यायालय व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या परवानगीने 19 कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कारागृहात कैद्यांची संख्या वाढल्यास अनेक कैदी किरकोळ कारणाहून कारागृहात एकमेकांशी वाद घालून मारहाण करुन जखमी होतात. तसेच कारागृहाच्या बंदी क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची संख्या झाल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

त्यामुळे गुन्ह्याची पार्श्वभूमी आणी शिक्षेचे स्वरुप पाहून येथील कैद्यांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासह येरवडा (पुणे) येथील मध्यवस्ती कारागृहात पाठविले. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये 13 कैदी तर येरवडा (पुणे) येथील मध्यवर्ती कारागृहात सहा कैद्यांची नुकतीच रवानगी केल्याची माहिती दुय्यम कारागृह निरीक्षक संदीप आठरे यांनी दिली. येथील दुय्यम कारागृहात सध्या विविध गुन्ह्यातील आणि विविध ठिकाणचे 40 कैदी ठेवण्यात आले आहे. त्यात 33 पुरुष कैद्यांसह सात महिला कैद्यांचा समावेश आहेत. आर्थिक फसवणुकीसह इतर फसवणूक, अवैध शरीर विक्री व्यवसाय, कौटुंबिक आणि सामूहिक अत्याचार, मारहाण, हत्या, हत्येचा प्रयत्न आणि शारीरिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात त्यांना कैद केले आहे.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एकूण 14 कैदी पाठविण्याचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी येथील कारागृह विभागाने तयार केला होता. त्याला जिल्हा न्यायालय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांची नुकतीच मंजुरी मिळाली. परंतु कैद्यांना इतर कारागृहात पाठविणार असल्याचे समजताच एका कैद्याने स्वत:च्या हातावर बाटलीने वार करुन जखमी करुन घेतले. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारागृहातील कैद्यांची संख्या वाढल्यास कैद्यांचा सांभाळ करणे कारागृह प्रशासनासमोर मोठे आव्हान असते. दुय्यम कारागृहाच्या बंदी क्षमतेपेक्षा अधिक कैदी आल्यास कारागृहाच्या यंत्रणेवर अधिक ताण पडतो. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विविध गुन्ह्यांत कारागृहात कैद असलेल्या अनेक कैद्यांना नियम आणि अटी घालून सरकारने वर्षभरापूर्वी घरी सोडले होते. त्यातील अनेक कैदी आजही कारागृहाबाहेर आपल्या कुटुंबासोबत घरात राहतात. त्यातील काही कैदी आता लहान-मोठ्या व्यवसायासह रोजंदारीचे काम करत आहे.
