योग्य व्यवस्थापन केल्यास शेती फायदेशीर : निलम खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्याच्या यांत्रिक युगाच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती न करता नवीन तंत्राचा वापर करून शेती करावी. योग्य व्यवस्थापन केले तर शेती तोट्यात न जाता फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन निलम खताळ यांनी केले.

संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात निलम खताळ बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर,तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही. एन. उघडे ,कृषीभूषण पुरस्कार विजेते विठ्ठलदास आसावा, शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ, कक्ष अधिकारी राजेश तिटमे, अधीक्षक मोहन कडलग, गणेश तोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

खताळ पुढे म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी शेतकरी शेतीत योग्य ते व्यवस्थापन करत होते. त्यामुळे एकरी ३० ते ४० पोते धान्य निघत होते.मात्र आता एका एकरात १० पोते सुद्धा धान्य निघणे अवघड झाले आहे. शेतीतील व्यवस्थापनाच्या कमतरतेमुळे हा परिणाम झाला आहे. पिकांचे योग्य नियोजन आणि मेहनत केली तर शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत, त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांचे भाषणे झाले.प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडके यांनी केले.सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी अजय पावसे यांनी तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी विजय शेलार यांनी मानले. यावेळी कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी विठ्ठलदास आसावा, तुकाराम गुंजाळ,अंजीर शेती उत्पादक भीमा उघडे, शेडनेट भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रशांत नवले, केळी उत्पादक शेतकरी किरण गोसावी, द्राक्ष उत्पादक संतोष डोंगरे तर बचत गटातून स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या शोभना सोनवणे यांनी आपले अनुभव व्यक्त केले.

शेतातील कृषि उत्पन्नाव्यतिरिक्त शिल्लक राहणारा काडीकचरा, पालापाचोळा, ऊसाचे पाचट शेतकरी पेटवून नष्ट करतात. शेतातील अवशेष जाळल्यामुळे जिवाणू नष्ट होऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने शेतीची उत्पादकता घटल्याचे निदर्शनास येत आहे. पर्यावरण व जमीन या दोन्ही साठीही हे नुकसानकारक असल्याचे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.शासनस्तरावर शेती अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत कृषी भूषण पुरस्कार विजेते विठ्ठलदास आसावा सावा यांनी सांगितले.

Visits: 121 Today: 2 Total: 1107566
