संगमनेरात अवैद्य कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा!  ३४ लाखाचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
शहरातील बहुचर्चित जमजम कॉलनीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध कत्तलखान्यावर छापा टाकत तब्बल ३४ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोमवारी शहरात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, शहरातील गल्ली नंबर नऊ मध्ये असणाऱ्या जमजम कॉलनीत हाजी मुदस्सर कुरेशी व नवाज जावेद कुरेशी हे त्यांच्या पत्राच्या गोडाऊनमध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत. त्यामुळे तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून जमजम कॉलनीत छापा टाकला असता त्या ठिकाणी आठ ते नऊ इसम गोवंश जनावरांची कत्तल करतांना मिळून आले. पोलिसांच्या कारवाई दरम्यान संशयित इसम हे आडोशाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणावरून २ हजार ७०० किलो गोमांस, दोन महिंद्रा बोलेरो पिकअप, एक अशोक लेलँड कंपनीचा बडा दोस्त, पाच दुचाकी, चार इलेक्ट्रिक वजन काटे, लोखंडी सुरा व लोखंडी कुऱ्हाड आणि दोन मोबाईल असा तब्बल ३४ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हाजी मुदस्सर कुरेशी रा. संगमनेर (फरार), नवाज जावेद कुरेशी, संगमनेर (फरार), फहीम कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, फरार), अक्रम कुरेशी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही, (फरार), समीर कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, (फरार) आणि इतर चार ते पाच अज्ञात इसमाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेरातील बहुचर्चित कत्तलखान्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गोवंश जनावरांची बिनदिक्कतपणे कत्तल केली जात आहे. अनेकदा या कत्तलखान्यांवर पोलिसांनी कारवाई करत कसायांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. मात्र असे असतानाही शहरातील बहुचर्चित कत्तलखान्यात निष्पाप गोवंश जनावरांच्या मानेवर सूरी चालवली जात आहे. त्यामुळे अशा कत्तलखाना चालवणाऱ्या कसायावंर ठोस कारवाई होण्याची गरज असल्याचे मत गो-प्रेमी मधून व्यक्त होत आहे.
Visits: 155 Today: 1 Total: 1580509

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *