भंडारदरा धरण रिंगरोडचे ग्रहण काही सुटेना! पर्यटकांसह व्यावसायिक रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त


नायक वृत्तसेवा, अकोले
भंडारदरा धरणाच्या रिंगरोडचे ग्रहण सुटण्याचे काही नाव घेईना. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा कळसच रस्त्यावर दिसून येत असल्याने रतनवाडीतील युवकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र देत कामाची गुणवत्ता सुधारण्याची विनंती केली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या रिंगरोडची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. दहा-बारा वर्षे या रस्त्याने डांबरच बघितले नव्हते. त्यामुळे रस्त्याची अवस्था असून नसल्यासारखी झाली होती. त्यामुळे या रस्त्याची दखल अनेक वृत्तपत्रांनी घेतली व थोड्याफार प्रमाणात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरले तर काही ठिकाणी डांबरीकरणाचा केविलवाणा प्रयत्न झाला. खड्डे असे भरले की ठेकेदाराला खड्डा कुठे आहे हेच समजत नसावे. शंभरामध्ये फक्त दहा खड्डे ठेकदाराने बुजविण्याची तसदी घेतली. तर उंबदरावाडीजवळ ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा कळसच दिसून आला. डांबरीकरण केलेले हाताने सुद्धा उकरले जाऊ लागले. तर कित्येक ठिकाणी डांबरीकरणाच्या अगोदर वापरलेली खडी व्यवस्थित न दाबल्याने परत रस्तावर जैसे थे झाली. डांबरीकरणासाठी डांबरांचा वापरच अत्यल्प झाल्याने डांबरावर टाकलेली कच अपघातास कारणीभूत ठरु लागली आहे. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचे काम सुरु असल्याने या परिसरातील नागरीक आता या रस्त्यालाच कंटाळली असून ‘गड्या आपुला पहिलाच रस्ता चांगला होता’ असा नागरिकांतून उमटत आहे.

उंबरदरावाडीजवळ एका वळणाच्या ठिकाणी तर ठेकेदाराने काय काम केले? असा सवाल कोलटेंभेचे सरपंच एकनाथ सारुक्ते यांनी केला आहे. रस्त्यावर अशी खडी पसरलेली आहे की दुचाकीस्वाराला आपली दुचाकी कमीत कमी दहा मिनिटे लोटत आणावी लागते. या खडीवरुन अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. या संदर्भात रतनवाडीतील व्यावसायिक एकत्र जमा झाले व थेट त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते गाठले. सकाळी अकरा वाजेपासून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची वाट बघितली, तेव्हा कुठे अधिकारी आले. त्यावेळी या रस्त्याच्या संदर्भात अधिकार्‍याकडे तक्रारी केल्या. मात्र अधिकार्‍यांनी दिलेल्या उत्तरांमुळे मात्र या युवकांचे समाधान झाले नाही. त्याचवेळी खासदार लोखंडे यांचे स्वीय सहायक तेथे आले. त्यांनाही रस्त्याच्या अडचणी सांगितल्या. ते खासदार साहेबांच्या कानावर घालतो असे सांगून निघून गेले. आजपर्यंत मात्र या रस्त्याची समस्या ही समस्याच राहिली आहे.

सध्या नाताळच्या सुट्ट्या सुरू असून, पर्यटकांचा ओघ भंडारदर्‍याला भरभरुन वाहत आहे. मात्र रिंगरोडवरुन प्रवास नको असे पर्यटक म्हणत आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. जर या रस्त्याच्या समस्या सुटल्या नाही तर व्यावसायिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्यासमोरच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

Visits: 111 Today: 1 Total: 1105811

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *