पिण्याच्या पाईप लाईनला घाण पाणी सोडले! श्रीरामपूरातील प्रकार; तिघाविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला छिद्र करून जाणीवपूर्वक त्यात घरातील घाण सांडपाणी सोडले म्हणून श्रीरामपुरातील वॉर्ड नं. १, मिल्लतनगर परिसरातील तिघा विकृत घर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साठवण तलावात शौचालयाचा मैला सोडल्याचे जागरूक नागरीकांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. पालिकेचे नगर अभियंता अभिषेक जितेंद्र मराठे यांनी पोलिसात फिर्याद दिली.त्यात म्हटले आहे की, साठवण तलावाचे काम चालू असताना, पाटाचे आवर्तन बंद असताना पाण्याच्या पाईपलाईनमधून तलावात पाणी येत असल्याचे तेथे हजर असलेले अभियंता निलेश पाटील यांच्या लक्षात आले. सदरचे पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त व घाण असल्याचे जाणवल्यावर पालिकेने त्या ठिकाणी प्लंबर बोलावून त्यांना पाईपलाईनच्या आतमध्ये पाहण्यासाठी पाठवले. सदरच्या पाईपलाईनला वरच्या बाजूस ३ ठिकाणी मोठे छिद्र पाडलेले आढळून आले आणि त्यातून जाणीवपूर्वक सांडपाणी पाईपलाईनमध्ये सोडण्यात आल्याचे आढळून आले.पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये जाणीवपूर्वक घाण पाणी सोडून शहरातील नागरीकांना पिण्याकरीता देण्यात येणाऱ्या पाण्याची योग्यता कमी केली म्हणून शहर पोलिसात हनीफशाह उस्मान शाह, फिरोज रशीद पठाण, रऊफ उस्मान शाह, सर्व रा.रेसिडेन्सीशेजारी, साठवण तलावाशेजारी, मिल्लतनगर, वॉर्ड नं. १, श्रीरामपूर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

वॉर्ड क्र. २ मधील गव्हाणे यांचे घर व परिसरातील १५० ते २०० घरांमध्ये गोवंश कत्तलीचे रक्त मिसळलेले दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी नळातून येत आहे. पिण्याचे पाणी सोडणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे तसेच प्रशासकीय अधिकारी यांचेकडेही नगरपालिकेचे ओळखपत्र नाहीत. तसेच २ वर्षांपासून नगरपालिकेचे ऑडिट झालेले नाही. अमरधाम रोड येथील मुतारीचे काम वारंवार तक्रारी करूनही झालेले नाही.असे गंभीर आरोप विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

Visits: 69 Today: 2 Total: 1098928
