पाटाचे पाणी संगमनेर तालुक्यात हा तर ऐतिहासिक क्षण : थोरात पाण्याने अकोल्याची हद्द ओलांडली; शेकडोंच्या उपस्थितीत झाले जलपूजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
निळवंडेचे स्वप्नं सोबत घेवूनच आपला राजकीय प्रवेश झाला. गेल्या तीन दशकांत धरणाच्या कामात अनेक अडचणी, अडथळे आणि आंदोलनेही आडवी आली. मात्र सुरुवातीपासून आम्ही धरणासह पाटासाठी आग्रही राहिलो. त्यातून धरणग्रस्तांचे प्रश्नही सोडवले गेले आणि त्यांना सोबत घेवूनच धरणाचे कामही पूर्ण झाले. आज तालुक्यातील दुष्काळी भागात पाटाद्वारे धरणाचे पाणी पोहोचले आहे याचा निश्चितच आनंद आहे. निळवंड्याच्या पाण्याचे पाटातून संगमनेर तालुक्यात पदार्पण हा जीवनातील ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
रविवारी (ता.4) रात्री उशिराने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याने अकोले तालुक्याची हद्द ओलांडून संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा शिवारात पदार्पण केले. यावेळी थोरात यांच्या उपस्थितीत या पहिल्याच पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, एकविरा फौंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे चेअरमन प्रताप उर्फ बाबा ओहोळ, माजी चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांच्यासह पिंपळगाव कोंझिरा व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपला आनंद व्यक्त करतांना थोरात पुढे म्हणाले की, निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण होण्यात अनेकांचे योगदान आहे. त्यांच्या सहभागाने, त्यागाने, प्रयत्नाने आणि कष्टाने हे एकत्रित यश मिळाले आहे. ज्या दुष्काळी भागात पाणी जाते, तेथे मोठे परिवर्तन घडते. निळवंड्याच्या पाटाने पारंपरिक दुष्काळी असलेल्या या भागातील शेतकर्यांच्या जीवनात आनंद फुलण्यासह त्यांच्या दारात समृद्धी नांदणार आहे. पाण्यात अर्थव्यवस्था गतीमान करण्याची ताकद असल्याने या पाण्यातून तालुक्याची आणि पर्यायाने राज्याचीही अर्थव्यवस्था बदणार असल्याचे ते म्हणाले.
तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळतंय याचा सर्वोच्च आनंद आहे, श्रेयासाठी लढण्याचा आपला स्वभाव नाही. त्यामुळे वारंवार अडथळे येवूनही आम्ही लढत राहिलो, प्रयत्न करीत राहिलो. त्यातूनच आजचा हा सुदिन आपण पाहतोय. धरण आणि पाटाचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत, परंतु कोणाच्या तोंडावर आपल्याला हात ठेवता येत नाही अशी मिश्किल टिपणी करीत त्यांनी जनता सगळे जाणून असल्याचेही सांगितले. वास्तविक डाव्या कालव्याचे काम सहा महिन्यापूर्वीच झाल्याचे सांगताना थोरात यांनी पंतप्रधान येणार असल्याचे सांगितले गेल्याने आपण गप्प राहिल्याचे नमूद केले.
परंतु आता उन्हाळा संपत आलाय, पावसाळा तोंडावर आहे. सुदैवाने धरणांमध्ये मुबलक पाणीसाठाही आहे, त्याचा वापर झाला पाहिजे हा आग्रह आम्ही ठेवला. खरेतर उजव्या कालव्यालाही एकपाणी देता येणं शक्य होतं असे सांगत त्यासाठी थोड्या घाईची गरज होती. परंतु ठीक आहे जे झालं ते गेलं आता लवकरात लवकर उजव्या कालव्याची कामे पूर्ण करुन त्या कालव्याला पाणी मिळावे यासाठी आपला आग्रह राहणार असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मेहेंदुरीजवळ पाटाला लागलेली गळती आणि पिंपळगावपर्यंत मातीकाम यामुळे नियोजित साडेनऊच्या सुमारास पोहोचणार्या पाण्याला तासभर विलंब झाला. मात्र या उपरांतही पहिल्या पाण्याचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या शेकडो शेतकर्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. चिकणी गावातील काहीजण तर जवळपास दोन किलोमीटर अंतरापासून पाण्याच्या पुढे पुढे चालून प्रवाहातील अडथळे बाजूला सारीत होते. जागोजागी कालव्याच्या काठावर बसलेल्या शेतकर्यांना पाण्याचे दर्शन होताच वाजणार्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी अंधारातही आनंदाचा झरा वाहताना दिसत होता.
प्रवाहातील असंख्य अडथळे पार करताना निळवंडेच्या डाव्या कालव्याने साडेनऊचा मुहूर्त टाळला. मात्र त्याचा उपस्थित शेतकर्यांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही. यावेळी पाण्याची आतुरतेने वाट पाहणार्या काही शेतकर्यांनी माईक हातात घेवून कोणी अभंगाच्या ओवी गायल्या, तर कोणी भजनांमधून आपला आनंद वाहता केला. रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपळगावात पाणी पोहोचताच जमलेल्या सुवासिनींनी कालव्याचे पूजन केले आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी कालव्यात उतरुन जलपूजन करीत आपला आनंद व्यक्त केला.