मंतरलेल्या काळातील आठवणी..

पहिल्यांदा जेल मधे आलं की बाहेरुन बोटासारखे दिसणारे जेलच्या बराकीचे गज दंडासारखे वाटायला लागतात.. पण काही दिवस इथ काढले की हेच गज करंगळीपेक्षाही बारीक वाटायला लागतात, त्या अनुभवी कैद्याने जेलचे तत्वज्ञान आम्हाला सांगितले..
15 डिसेंबर 1975, आम्ही आणीबाणी विरोधात सत्याग्रह केला, आम्हाला अटक झाली. झडतीचे, हातांचे ठसे घेण्याचे आमच्या खिशातले होते नव्हते ते काढून घेण्याचे सोपस्कार झाले आणि आमची रवानगी सबजेलच्या कस्टडीत झाली.. तेव्हा आम्ही कॉलेजच्या दुसर्या, तिसर्या वर्षाला होतो. आम्ही विद्यार्थी परिषदेच्या सहा कार्यकर्त्यांनी संगमनेर कॉलेजच्या परिसरात आणीबाणी विरोधात घोषणा देऊन सत्याग्रह केला होता.. आम्ही आणीबाणी विरोधात काहीतरी आंदोलन करणार आहोत याचा पोलिसांना आधीच सुगावा लागला होता. आम्ही दोन-तीन दिवस भूमिगत असताना घरावर चोवीस तास पोलिसांची नजर होतीच. कॉलेजमधे पोलीस फौजफाटा हजर होता.. ऑफिसमधे आम्हाला आणून बसवलं, तिथं बसलेले आणि आम्हाला ओळखणारे प्राध्यापक पटकन उठले.. हो उगीच आम्ही ओळख दाखवली तर.. कॉलेजमधली खूप मुलं तिथे जमली. दोन-तीन इन्स्पेक्टरनी आमची ओळख परेड घेतली, त्यांच्या कार्यक्षेत्रात आणीबाणी विरोधात आंदोलन झालं याने ते बिथरलेले होते.. तेंव्हा मंत्री असलेल्या खताळ पाटलांची तशी ताकीदच होती.

एकेका पोलीस कॉन्स्टेबलने आमच्या गळ्यात हात टाकले, दुसर्याने दंड धरला आणि पोलिसांच्या निळ्या व्हॅनमधून पोलीस स्टेशनला आणले. आणताना गावातले रस्ते टाळले, न जाणो आम्ही पुन्हा घोषणा दिल्यातर..?. आम्हा सहाही जणांना एकाच कस्टडीत ठेवले.. दोनशे अडीचशे स्क्वेअर फुटाच्या त्या कस्टडीत आधीच सात आठ कैदी होते. त्यांनी आमची ओळख परेड घ्यायला सुरुवात केली.. आणि आम्ही त्यांच्यापैकी नाही हे लक्षात आल्यावर काय येडपट आहेत, कशाला आले? असा भाव घेऊन आमच्याकडे बघायला लागले.. शरीराच्या आकारातला एक सतरंजीचा तुकडा, एक अॅल्युमिनियमची पोचे पडलेली थाळी आम्हाला मिळाली.. पहिली रात्र झोपेशिवायच गेली..

सकाळी काठी आपटत पोलीस आला, प्रातःर्विधीसाठी सगळ्यांना बाहेर काढले. त्याच आवारात कैद्यांसाठी व्यवस्था होती. दार न लावता त्याचा वापर करावा लागतो आणि दिवसातून फक्त एकदाच यासाठी कैद्यांना बाहेर काढले जाते. नंतर कोठडीच्या कोपर्यात एक उघडी मोरी होती.. मग दिवसभर तिचाच वापर व्हायचा.. कैद्यांना भत्ता पुरविणार्या ठेकेदाराने चक्कर मारुन नवीन कोण आलेत हे बघितले. वेणूबाई आणि दत्तू नाना मंडलिक यांचा आळीपाळीने भत्ता असायचा. सकाळी एक चहा मिळायचा.. नंतर अकरा वाजता जेवण यायचं. आपल्या थाळीत ते घ्यायचं.. भाकरी आणि कसली तरी पाणीदार भाजी मिळायची.. प्यायचं पाणी कस्टडीच्या बाहेर एका मोठ्या पातेल्यात होतं. गजातून हात बाहेर काढून साखळीला लावलेल्या ग्लासातून ते घ्यायचं.

खुनाच्या आरोपी पासून गावठी दारुच्या धंद्यावाल्यापर्यंत सर्व प्रकारचे गुन्हेगार त्या कस्टडीत होते.. त्यांच्या सुरस कथा आणि त्यांची तंत्रही त्यांच्याशी बोलतांना समजली. खिसा कसा साफ करायचा, तेे करताना लक्षात आले तर काय करायचे याची गुपितही त्यांनी आम्हाला सांगितली. पोलिसांनी दोन-चारदा रात्रीच्यावेळी चौकशीसाठी बाहेर काढले. कोणाच्या सांगण्यावरुन आम्ही सत्याग्रह केला?, आणखी काही घडणार आहे का? हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.. सत्याग्रह करताना पत्रक वाटू नका हे ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं ते पोलिसांनी आणखी छळू नये यासाठी होतं हे तेव्हा आम्हाला समजलं.

नेमके कधी सुटलो हे आता आठवत नाही पण, दोन-तीन आठवडे त्या कस्टडीत घालवल्यावर आमची तयारी नसताना इथे बसून काय करणार?, जामीन मिळाला तर घेऊ या असे ज्येष्ठांनी ठरविले आणि राज्य सरकार उलथून टाकण्याचा कट केला असा भारत संरक्षण कायद्यातील गंभीर आरोप असतानाही आम्हाला जामीन मिळाला. पण रोज पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर.. बाहेर आल्यावर आमच्या एक्टिव्हिटीज् पुन्हा सुरु झाल्या. कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गा भागवत आणिबाणी विरोधात उघड बोलायच्या. आम्ही त्यांची एक जंगी सभा घेतली..

जानेवारी 1977 ला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या.. तो पन्नास दिवसांचा प्रचार म्हणजे झंझावात होता.. सगळी भीती आणि दादागिरी, दहशत झुगारुन सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले.. निवडणुकीत इतिहास घडला.. इंदिरा गांधींसह सगळा काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला.. या मंतरलेल्या काळातल्या न पुसणार्या आठवणी आणि आम्ही घेतलेला क्रांतिकारी अनुभव हा आमच्यासाठी लाख मोलाचा ठेवा आहे, कायमसाठी..!
विनय गुणे, संगमनेर
(लेखक विद्यार्थीदशेत असताना आणिबाणीच्या काळात कारागृहात राहीले आहेत.)

