घरगुती व व्यापारी वीजबिलांत सूट द्या ः आ.काळे
घरगुती व व्यापारी वीजबिलांत सूट द्या ः आ.काळे
अक्षय काळे, कोपरगाव
मार्च 2020 पासून महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या विक्रम घडवत आहे. यामुळे राज्य शासनाने नागरिक व व्यवसायांवर अनेक कडक निर्बंधाची कठोर अंमलबजावणी सुरु केल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. यातून सावरण्यासाठी राज्य शासनाने घरगुती आणि व्यापारी वीजबिलांत सूट द्यावी, अशी मागणी कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
![]()
सदर निवेदनात आमदार काळे यांनी म्हंटले की, कोरोनातून सावरण्यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांना किमान दोन वर्षे अति परिश्रम घ्यावे लागेल. सध्या मिळणारे उत्पन्न अंत्यत कमी आहे. याच भीषण परिस्थितीत वीज वितरण कंपनी मोठ्या रकमेची बिले पाठवत आहे. बिले थकली तर खासगी सावकराप्रमाणे दंडेलशाहीने 2 टक्के मासिक दंड म्हणून आकारणी केली जाते. हा प्रकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. याबाबत जनतेत राज्यशासनाबाबत प्रंचड असंतोष आहे. उद्योजकांना मीटरचे भाड्यापोटी महिन्यास 500 रूपयांची मागणी असते. या ग्राहकांचा वीज वापर 100 यूनिटच्या आत असल्यावरही वसूल करण्याचा प्रकार झिजिया करापेक्षा कू्ररतेचा आहे. तेव्हा या संकटातून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गत काही दिवसांपूर्वी वीज बिल आकारणीत 30 ते 35 टक्के सूट देण्याबाबत विचार विनिमय झाला होता. याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

