राहुरीतील धर्मांतराचे गडांतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडेंवर! लक्ष्यवेधीने पाठविले नियंत्रण कक्षात; कारवाई विरोधात राहुरीकरांचा ‘चक्काजाम’..

नायक वृत्तसेवा, राहुरी

सुमारे आठ महिन्यांपूर्वी राहुरीतील ‘ब्राह्मणीत’ घडलेला धर्मांतराचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित झाला आणि एकप्रकारे पोलिसांच्या दृष्टीने बासनात गेलेल्या या प्रकरणातील हलगर्जीपणा पोलीस निरीक्षक प्रताप दराडेंना भोवला. आमदार राम सातपुते यांनी मांडलेल्या या मुद्द्यावरुन प्रभारी गृहमंत्री शंभुराज देसाई यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तोपर्यंत पोलीस निरीक्षक दराडे यांना नियंत्रण कक्षात पाचरण केले. यंत्रणेच्या दृष्टीने चौकशीचा हाच प्रघात असला तरीही दराडेंसारख्या गुन्हेगारांना दरडावणार्‍या अधिकार्‍याची अशाप्रकारे उचलबांगडी राहुरीकरांना मात्र भावली नाही. त्यामुळे शासनाच्या याच निर्णयाच्या विरोधात आज नगर-मनमाड महामार्ग तासभर रोखून धरण्यात आला. आजच्या आंदोलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आघाडी सरकारच्या काळात ज्यांनी याच अधिकार्‍याच्या नावाने ‘शिमगा’ केला, त्यातील काहीजण आज त्याच अधिकार्‍याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरल्याचेही अनोखे चित्र बघायला मिळाले.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार 8 एप्रिल रोजी पंजाबमधून थेट राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीत अवतरलेल्या कमलसिंग नामक इसमाने तेथील एका महिलेचे बळजोरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने ब्राह्मणीत मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र असा प्रकार घडलाच नाही असे म्हणतं राहुरी पोलिसांनी चक्क कानावरच हात ठेवले. त्यातून एका वर्गाच्या मनात रोष खदखदत राहिला. त्यातूनच हा विषय थेट खासदार अमर साबळे आणि आमदार नीतेश राणे यांच्यापर्यंत जावून पोहोचल्याने त्यांनी मुंबईतून थेट अहमदनगर गाठले आणि आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष्य वेधले. त्यामुळे राहुरी पोलिसांना सदर प्रकरणाची दखल घेणं भाग पडलं.

गुन्हा दाखल करताना त्यात विनयभंगासारख्या गंभीर कलमाचा समावेश केला गेला. प्रत्यक्षात ज्या विरोधात तक्रार आहे, त्या मुख्य मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही असलेल्या नागरिकांनी कमलसिंग नावाच्या ख्रिश्चन धर्मप्रसारकाने सदरील महिलेला आपल्या धर्माचे महत्त्व पटवून देताना हिंदु धर्मियांमध्ये पूजनीय असलेल्या प्रतिकांची विटंबणा केल्याचे निक्षून सांगितले. मात्र राहुरी पोलिसांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. विनयभंगाच्या एकमेव गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होवूनही पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आरोपीला गजाआड करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे आरोपीला त्याचा फायदा होवून त्याने न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनही मिळवला. पोलिसांच्या या भूमिकेने अशाप्रकारांना एकप्रकारे खतपाणीच मिळाल्याने काही दिवसांपूर्वी एक महिला शिक्षिकेकडून चक्क लहानशा विद्यार्थ्याला धर्मांतराची महती सांगण्याची घटनाही समोर आल्याचा आरोप ठेवून दराडेंविरोधात चौकशी सुरु करण्यात आली.

मात्र गेल्या काही महिन्यात राहुरीतील गुन्हेगारीसह कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याने पोलिसांविषयी जनमानसात सन्मान वाढला होता. जिल्ह्यात एकीकडे खमक्या अधिकार्‍यांच्या अभावाने संगमनेर शहरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणची गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे मुळा धरणाच्या पाण्याने फुललेल्या राहुरी परिसरातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून पोलीस निरीक्षक दराडेंनी भूमिका बजावली होती. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडछाडी विरोधात त्यांनी घेतलेली कठोर भूमिकाही राहुरीकरांच्या पसंतीस उतरली. मात्र ब्राह्मणीतील प्रकरण त्यांना भोवले आणि त्याचे गडांतर त्यांच्यावर येवून कोसळलेच. सध्या त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या विरोधातील चौकशी पूर्ण होईस्तोवर ते तेथेच राहतील.

मात्र त्यांच्याविरोधातील ही कारवाई राहुरीकरांना पटली नाही. शुक्रवारी हा विषय समोर आल्यापासूनच राहुरीतून त्याला विरोध सुरु झाला. विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व पुढार्‍यांनी आंदोलनाचे आवाहन केले. त्यातून आज सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यात साईभक्तांच्या अनेक वाहनांचाही समावेश होता. यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक दराडे यांची नियंत्रण कक्षात केलेली बदली रद्द करण्यासाठीचे निवेदन सोपवून आंदोलनाची सांगता केली, मात्र निर्णय न झाल्यास पुन्हा आक्रमक होण्याचा इशाराही देण्यात आला. आजच्या चक्काजाम आंदोलनात माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेनेचे (ठाकरे गट) उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, रिपब्लिकन पार्टीचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदिंसह विविध संघटना व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थीही सहभागी झाले होते.


या आंदोलनादरम्यान गंभीर रुग्णाला घेवून रुग्णालयाकडे निघालेल्या एका रुग्णवाहिकेला काही क्षणात वाट मोकळी करुन देण्यात आली, तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलनामुळे अडकून पडलेल्या एका शाळेच्या बसमधील विद्यार्थ्यांची थेट बसमध्ये जावून भेट घेत दिलगिरी व्यक्त केली. या दोन्ही घटना आंदोलनातील मानवतेचे प्रतिबिंब दाखवणार्‍या होत्या.

Visits: 22 Today: 2 Total: 117751

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *