जिल्ह्यातील पहिल्याच कारवाईत विशेष पथकाची दहशत! दशकानंतर संगमनेरचे ‘मटका किंग’ कचाट्यात; प्रभारी अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई?..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासूनच अवैध व्यवसायांबाबत कठोर भूमिका जाहीर करणार्‍या पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारा घेतलेल्या बैठकीत सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनाही अंधारात ठेवून आपल्या ‘विशेष पथका’द्वारे जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या मूळावर ‘घाव’ घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी संगमनेरात अनुभवायला मिळाला. परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने संगमनेरातील दोघा मटका किंगच्या ठिकाणांवर धाडी घालीत ‘अर्थपूर्ण’ संबंधातून आजवर कारवाईपासून ‘वंचित’ असलेल्या मुख्य आरोपींसह एकूण 35 जणांना कायद्याच्या कक्षेत घेत त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 10 लाख 46 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या पहिल्याच धडाकेबाज कारवाईने जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर विशेष पथकाची दहशत निर्माण झाली आहे.


गेल्या महिन्यात (ता.23) पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या अवैध व्यवसायांबाबत कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेसह अन्य सर्व शाखा व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारा घेतलेल्या बैठकीतही त्यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही भागात कोणत्याही स्वरुपाचा अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यास थेट आपल्या नियंत्रणाखालील ‘विशेष पथका’कडून कारवाई करण्याचा निर्वाणीचा इशाराही दिला होता. त्यांच्या आदेशानंतर सुरुवातीचे काही दिवस जिल्ह्यातील अवैध व्यवसाय कोटकोर बंदही झाले, मात्र काही दिवसांत हळूहळू ते पूर्ववत होवू लागल्याने पोलीस अधिक्षकांनी स्थापन केलेले ‘विशेष पथक’ कार्यान्वित करण्यात आले.


जिल्ह्यात पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक म्हणून शेवगाव-नेवाशाचा पदभार असलेल्या संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने बंद असल्याचे आभासी चित्र निर्माण करुन जोमाने सुरु असलेल्या संगमनेरातील मटका व्यवसायाला लक्ष्य केले. शहरात मटक्याच्या दोन पेढ्या चालवल्या जातात. त्यातील एक पेढी सय्यद अशरफ समशेरअली व दुसरी पेढी दत्तात्रय भागप्पा इटप व शंकर भागप्पा इटप या दोघांची आहे. विशेष पथकाने शुक्रवारी (ता.20) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास तेलिखुंट परिसरातील इटप बंधूच्या ठिकाणावर धाड घातली. यावेळी त्या ठिकाणी शंकर भागप्पा इटप (वय 52), दत्तात्रय भागप्पा इटप (वय 69, रा.तेलिखुंट) या मुख्य पेढी चालकांसह नानासाहेब बापू जाधव (वय 46, रा.रायते), सुरज रामसिंग ताम्रकर (वय 34, पम्पिंग स्टेशन), अण्णासाहेब कुंडलिक खताळ (वय 56, रा.धांदरफळ), रवींद्र नंदराम हासे (वय 50, रा.माळीवाडा), हौशिराम रामभाऊ कहांडळ (वय 55, रा.सावरचोळ),


इक्बाल बशीर शेख (वय 65 रा.गवंडीपूरा), शेखर भास्कर जाधव (वय 35, रा. घुलेवाडी), नानासाहेब भीमराज उर्किडे (वय 60, रा. निळवंडे), रामदास गणपत माळी (वय 45, रा.रायते), कैलास बाबुराव जाधव (वय 50, रा.खांडगाव), शिवाजी दत्तू सातपुते (वय 40, रा.कुरणरोड), राजू रामनाथ झांबरे (वय 52, रा.उपासणी गल्ली), मधुकर नामदेव भोर (वय 40, रा. घुलेवाडी), बाळासाहेब कारभारी पवार (वय 50, रा.ओझर), भाऊसाहेब नाना काळे (वय 50, रा.आनंदवाडी), शंकर संतोष सवारगे (वय 65, रा.वैदूवाडी), रमेश बाबुराव सरोदे (वय 74, रा.देवीगल्ली), दगडू रामचंद्र पवार (वय 62, रा.कनोली), दत्तू तुकाराम अनाप (वय 60, रा.कासारा दुमाला), अस्लम सुलतान शेख (वय 35, रा.समनापूर), हरीभाऊ बबन पवार (वय 47, रा.निळवंडे), मनोहर काशिनाथ अभंग (वय 74, रा.माताडे मळा),


संभाजी किसन साळवे (वय 62, रा.निमगांव जाळी), सुदर्शन दत्तात्रय इटप (वय 42, रा.तेलिखुंट), सोमनाथ शिवदास यादव (वय 40, रा.कवठे कमळेश्‍वर),विश्‍वनाथ नाना अल्हाट (वय 70, रा.पम्पिंग स्टेशन) व सुभाष सीताराम खैरे (वय 55, रा.जोर्वे) अशा 29 जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांच्या ताब्यातून 74 हजार 650 रुपयांच्या रोकडसह चार लाख 35 हजार रुपये मूल्याच्या नऊ दुचाकी, दोन लाख 26 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळे मोबाईल संच असा एकूण सात लाख 35 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर काही वेळातच साडेसहाच्या सुमारास विशेष पथकाने कोल्हेवाडी रस्त्यावरील उघड्या जागेत बिनधास्त सुरु असलेल्या सय्यद अशरफ समशेरअली या दुसर्‍या मटका किंगच्या ठिकाणावर छापा घालून मुख्य आरोपी सय्यद अशरफ समशेरअली (वय 46), नावेद अशरफ सय्यद (वय 23), सय्यद नजाकत समशेरअली (वय 42), रियाज बापूमियाॅ देशमुख (वय 50, सर्व रा.जहागीरदारवाडा, तीनबत्ती),


आयन साजीद सय्यद (वय 27, रा.कोल्हेवाडी रोड) व हुसनेन रौफ पटेल (वय 26, रा.अलकानगर) अशा सहाजणांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्या ताब्यातून 53 हजार 660 रुपयांच्या रोकडसह तीन दुचाकी आणि आठ मोबाईल असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये संगमनेरात पारंपरिक मटका चालवणार्‍या आणि दशकापासून थेट कारवाईपासून ‘वंचित’ असलेल्या दोघा मटाका किंगसह शहरातील विविध ठिकाणी आकडे घेणार्‍यांवर अलिकडे पहिल्यांदाच धडक कारवाई झाल्याने जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखालील पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांच्या ‘विशेष पथका’ने आपल्या पहिल्याच कारवाईत गुन्हेगारी प्रवृत्तींवर दहशत निर्माण केली आहे.


जिल्ह्यात प्रचंड फोफावलेल्या अवैध व्यवसायाविरोधात एल्गार पुकारताना पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना निर्वाणीचा सज्जड इशारा दिला होता. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दित अशाप्रकारच्या अवैध व्यवसायावर विशेष पथकाकडून कारवाई होईल त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारा घेतलेल्या बैठकीत दिला होता. त्यानंतर संगमनेर शहरातील मटक्याच्या अड्ड्यांवर छापेमारी होवून 35 आरोपींसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल आणि मटक्याचे साहीत्य आढळून आल्याने आता जिल्ह्यातील पहिली शिस्तभंगाची कारवाई संगमनेरात होणार का? याकडे जिल्ह्यातील पोलीस दलाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी लाचखोरी आढळल्यानंतर अशाप्रकारच्या कारवाया केल्या होत्या.

Visits: 43 Today: 2 Total: 637903

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *