नूतन पोलीस अधीक्षकांना नेवाशातील कट्टेतस्करांची संगमनेरात सलामी..! शहर पोलिसांच्या पथकाने गावठी पिस्तुलासह दोघांना केली अटक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर पोलीस ठाण्यातील अंतर्गत राजकारणातून तपास शाखेचे दोन भाग निर्माण केले गेल्याने या दोन्ही ‘टीम’ची परस्परपरांशी जणू स्पर्धा लागली आहे. त्यातूनच बुधवारी रात्री संगमनेर खुर्दच्या शिवारात पहिल्या टीमने सापळा लावून गावठी कट्ट्यासह दोघांना जेरबंद केले. या घटनेने संगमनेरातील गुन्हेगारीचे गांभिर्य अधोरेखीत होण्यासोबतच प्रत्येक गुन्ह्याची उकल करण्याची क्षमता असूनही तपास का होत नाही असाही सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणी नेवासा येथील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा व दोन जीवंत काडतूसांसह 97 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या वृत्ताने शहरातील गुन्हेगारीच्या वलयावर प्रकाश पडण्यासोबतच जिल्ह्यातील गावठी कट्ट्यांच्या तस्करीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक अभय परमार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी बुधवारी (ता.21) रात्री नऊच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना माहिती देत रायतेवाडी शिवारात सापळा लावण्या बाबत सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी पो.कॉ.धादवड, हांडे व तळेकर यांच्यासह संगमनेर खुर्दच्या शिवारातील रायतेवाडी फाट्यावर सापळा लावून मिळालेल्या वर्णनानुसारच्या मोटार सायकलचा शोध सुरु केला.

याच दरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास जून्या पुणे-नाशिक महामार्गाने झोळे टोलनाक्याच्या दिशेने एक विना क्रमांकाची दुचाकी व त्यावरील दोघेजण येत असल्याचे पथकाला दिसले. त्यांनी संबंधिताला थांबण्याचा इशारा करीत त्यांची अंगझडती घेतली असता दुचाकी चालकाच्या कंबरेला गावठी पिस्तुल असल्याचे पोलिसांना आढळले, अधिक तपासणी करता सदर पिस्तुलात दोन जीवंत काडतूसे असल्याचेहीे दिसून आले. पंचासमक्ष मिळालेल्या या मुद्देमालाचा पंचनामा करुन पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी आपली ओळख पृथ्वीराज उर्फ देवा आबासाहेब देशमुख (वय 30) व किरण विजय दळवी (वय 24, दोघेही रा.शिरसगाव, ता.नेवासा) असल्याचे सांगीतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल, दोन हजार रुपये किंमतीचे दोन जीवंत काडतूस, 50 हजार रुपये किंमतीची विना क्रमांकाची दुचाकी व प्रत्येकी दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोर्बाइल असा एकूण 97 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पो.कॉ.अशोक गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील दोघांवर भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 सह मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1)(3) चे उल्लंघन व 135 प्रमाणे कारवाई करतांना दोघांनाही आज पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. यावृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील ‘कट्टानाट्य’ पुन्हा रंगात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दित घडणार्या विविध गुन्ह्यांचे जलदगतीने तपास व्हावेत यासाठी त्या त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आपल्या सोयीनुसार तपास पथक (डीबी) निर्माण करीत असतात. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातही अशाच पद्धतीने पथक निर्माण केले गेले आहे. मात्र सदरचे पथक निर्माण करण्यामागील मूळ हेतू कधीही साध्य झाल्याचे आजवर ऐकिवात नाही, त्यामुळे कोणतीही अधिकृत मान्यता नसलेल्या या पथकांची निर्मिती कशासाठी असेही प्रश्न वारंवार उपस्थित होत असतात. शहर पोलीस ठाणेही त्याला अपवाद ठरलेले नाही.

मात्र संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधित प्रभारी अधिकार्यांनी एक पथक स्थापन करण्याचीही मान्यता नसतांना तब्बल दोन दोन पथके कार्यान्वीत केल्याने त्यांच्या यामागील भूमिकेवरुन शहरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच बुधवारी रात्री पहिल्या पथकाने सापळा लावीत चक्क काही वर्षांपूर्वी मागे पडलेल्या कट्टा तस्करीवरील पडदा पुन्हा एकदा उठवल्याने जिल्हाभर त्याचे पडसाद उमटणार आहेत. या कारवाईतून शहर पोलीस ठाण्यात अनधिकृतपणे निर्माण केल्या गेलेल्या या दोन पथकांमध्ये वरचढ ठरण्याची स्पर्धाही सुरु झाल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील नेवासा हे ठिकाण विविध अवैध व्यवसायांसह कट्टा तस्करीचे केंद्र मानले जाते. दोन वर्षांपूर्वी त्तकालीन पोलीस अधीक्षकांनी ‘मिशन ऑलआऊट’ सुरु करुन जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची धरपकड करुन मोठ्या संख्येने हत्यारे जप्त केली होती. संगमनेरातही वाळु, गांजा, मटका, जुगार व अंमलपदार्थांच्या व्यापारातून गडगंज झालेल्या अनेकांनी गावठी कट्टे बाळगल्याची अनधिकृत माहिती आहे. मात्र संगमनेर शहर पोलिसांना ना त्यांचा शोध घेता आला ना मिशन ऑल आऊट यशस्वी करता आले. आता पुन्हा तोच विषय चर्चेत आल्याने शहर पोलीस पुन्हा एकदा त्याच्या केंद्रस्थानी आले आहेत. नूतन पोलीस अधीक्षकांना नेवाशातील कट्टेतस्करांनी संगमनेरात दिलेली ही सलामी ते किती गांभिर्याने घेतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

