थोरात क्रीडा संकुलात उद्या योग दिनाचे आयोजन : डॉ. जयश्री थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
धावपळीच्या जीवनात चांगल्या आरोग्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा असून एकवीरा फाउंडेशन, सह्याद्री विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज तसेच जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार दि.२१ जून रोजी सकाळी ७.३० वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.

या संयुक्त योग दिनाच्या बाबत माहिती देताना युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य व सबलीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असून या निमित्ताने उद्या सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत योगा शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, आमदार सत्यजित तांबे हे ही सहभागी होणार आहेत. याचबरोबर सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील सुमारे दोन हजार विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याचबरोबर संगमनेर शहर व तालुक्यातील महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. उद्या शनिवारी होणाऱ्या या योग दिनाच्या शिबिरात शहर व तालुक्यातील सर्व युवक कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन, सह्याद्री विद्यालय, ज्युनिअर कॉलेज आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Visits: 183 Today: 2 Total: 1099227
