भंडारदरा परिसरात पावसाची संततधार भात रोपाला जीवदान; धबधबे ही झाले वाहते

नायक वृत्तसेवा, राजूर
बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवसापासून सुरू झालेल्या पावसाने परिसरात गारवा निर्माण झाला असून दिवसभर हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत.

महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनचं लवकर आगमन झाले असले, तरी भंडारदऱ्याच्या पाणलोटात तो उशिरा पोहोचला. या आधी अवकाळी पावसाने भंडारदरा परिसरात चांगलीच बॅटिंग केली होती. मात्र अखेर सोमवारी मान्सून दाखल झाला आणि परिसरातील ओढे-नाले वाहू लागले. घाटघर येथील उर्ध्व धरण भरून वाहू लागले आहे, तर धरणातून प्रवरा नदीमध्ये ४५० क्युसेक्सने विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण शाखेकडून मिळाली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरण क्षेत्रात पाण्याची नव्याने आवक सुरू झाली आहे. भंडारदरा धरणात सध्या २४४५ दशलक्ष घनफूट (२२.२५ टक्के) पाणीसाठा असून निळवंडे धरणात २५९० दशलक्ष घनफूट (३२.०८ टक्के) पाणीसाठा आहे. सध्या दोन्ही धरणांमधून कोणताही विसर्ग सुरू नसल्याची माहिती धरण शाखाधिकाऱ्यांनी दिली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने कोलटंबे येथील वसुंधरा धबधबा, नान्ही फॉल, नेकलेस फॉल हे धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. जमिनीची आधीच तहान भागल्यामुळे भातखाचरांत पाण्याची पातळी वाढू लागली आहे.

भंडारदरा पाणलोटातील घाटघर, पांजरे, उडदावणे, साम्रद, रतनवाडी या परिसरातही पावसाचा जोर कायम असून शेतकरी वर्गाच्या आशा उंचावल्या आहेत. पावसामुळे धबधबे सक्रिय झाल्याने पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरली आहे.

Visits: 201 Today: 1 Total: 1411819
