संगमनेर म्हणजे माहेश्वरी समाजाची राजधानीच ः मालपाणी माहेश्वरी पंच ट्रस्ट; कार्याध्यक्षपदी मालपाणी यांच्यासह नूतन कार्यकारिणीची निवड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या माहेश्वरी पंच ट्रस्टला भरीव सामाजिक कार्याची सात दशकांची दिमाखदार परंपरा लाभलेली आहे. सर्व नूतन पदाधिकार्यांना सोबत घेऊन एकदिलाने ही परंपरा अधिक जोमाने पुढे न्यायची आहे, असे प्रतिपादन माहेश्वरी पंच ट्रस्टचे नूतन कार्याध्यक्ष, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांनी केले.
माहेश्वरी पंच ट्रस्टच्या नूतन कार्यकारिणी मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाजाच्या नेत्यांची एकमताने विश्वस्त मंडळाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली. या बैठकीत विश्वस्त मंडळाच्या उपाध्यक्षपदी राणीप्रसाद मुंदडा व मनीष मणियार, सचिवपदी श्रीकांत उर्फ बाळासाहेब कासट, कोषाध्यक्षपदी सीए. कैलास सोमाणी, विश्वस्तपदी प्रमोद मणियार, राजकुमार पोफळे, विशाल नावंदर, श्रीनाथ राठी, राजेश आर. मालपाणी, मुकुंद सोमाणी यांची तर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतुल झंवर, भांडी समितीच्या अध्यक्षपदी कैलास आसावा, निरीक्षक मंडळाच्या सदस्यपदी अनिल अट्टल, रामबिलास बंग, सुरेशचंद्र जाजू, विश्वनाथ कलंत्री, ललिता चंद्रकांत करवा, ओंकारनाथ कासट, अशोक लाहोटी व सुरेशचंद्र बिहाणी यांचीही यावेळी निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना मालपाणी पुढे म्हणाले की, माणसाची पहिली ओळख परिवारातून व त्यानंतर समाजातून होते. परिवार, समाज, गाव, जिल्हा, राज्य आणि देश अशी ती पुढे विस्तारत जाते. याचा अर्थ आपल्या देशात समाजव्यवस्थेला खूप महत्त्व असल्याचे दिसून येते. राज्यात पुणे, इचलकरंजी व अमरावती या तुलनेने खूप मोठ्या असलेल्या शहरांमध्ये आपल्या समाजाची संख्याही मोठी आहे. मात्र असे असतानाही संगमनेरला माहेश्वरी समाजाची राजधानी म्हणून ओळखले जात असल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेरातील माहेश्वरी समाज आधुनिक विचारसरणीचा आहे. कालानुरुप बदलत असलेल्या समाजाचे नवनवीन नियम तयार करण्याचे काम संगमनेरात होते आणि त्याची अंमलबजावणी मात्र सर्वत्र केली जाते यावरुनच संगमनेरच्या माहेश्वरी समाजाचे राज्यातील स्थान अधोरेखीत होत असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
ओंकारनाथजी मालपाणी यांनी अनेक वर्ष माहेश्वरी समाजाचे अध्यक्षपद भूषविलेे. राधेश्याम पडताणी, नीलेश जाजू यांनी आपल्या कारकीर्दीत चांगले काम केल्याचे सांगत त्यांनी समाजाच्या विविध योजनांचा आढावाही घेतला. माहेश्वरी पंच ट्रस्टच्या माध्यमातून भंडारी मंगल कार्यालय, सोमाणी मंगल कार्यालय, मोठे बालाजी मंदिर, राजस्थान चित्र मंदिराचा सातत्याने विकास केला गेल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. राजस्थान चित्र मंदिराच्या विस्तीर्ण जागेत व्यापारी संकुल उभारण्यासह सोमाणी मंगल कार्यालयात काय नवीन करता येईल यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सुदैवाने आपल्या सोबत ऊर्जावानांची टीम निवडली गेल्याने भविष्यात समाजातील गरजू लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प, शहराबाहेर अत्याधुनिक मंगल कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि नूतन पदाधिकार्यांचा उत्साह यांचा सुरेख संगम नूतन पदाधिकार्यांच्या कामातून दिसेल असा विश्वास यावेळी नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.