जिल्ह्याची रुग्णसंख्या एक हजाराच्या आंत! अहमदनगर महापालिका क्षेत्रात उच्चांकी रुग्ण; अन्य तालुक्यांतील संख्या मात्र घटली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या तिसर्‍या लाटेतही अहमदनगर जिल्ह्याचा प्रवास खडतर ठरत असून दररोज मोठ्या संख्येने समोर येणारे रुग्ण आणि वाढत असलेली सक्रीय रुग्णांची संख्या चिंताजनक ठरत आहे. मात्र त्याचवेळी रुग्णालयातील उपचाराधीन रुग्णांची संख्या अगदीच नगण्य असून बाह्यरुग्ण विभागातील उपचारांनी बर्‍या होणार्‍या रुग्णांची संख्या 90 टक्क्यांहून अधिक असल्याने दुसर्‍या लाटेच्या तुलनेत वैद्यकीय सेवांची मागणीही जेमतेम आहे. गेल्या सहा दिवसांत दररोज हजारांहून रुग्ण आढळत असतांना आज मात्र त्यात मोठी घट झाल्याने राज्यातील अन्य ठिकाणांसह जिल्ह्यातील रुग्णसंख्याही उताराला लागल्याचे दिलासादायक चित्र आज निर्माण झाले आहे, मात्र त्यात सातत्याची अपेक्षा आहे. आत जिल्ह्यातील 951 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यात केवळ ईमदनगर महापालिका क्षेत्रात तीन आकडी रुग्ण आढळले असून उर्वरीत तालुक्यातील रुग्णसंख्या घटली आहे. संगमनेर तालुक्यातूनही आज 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 35 हजार 266 झाली आहे.


राज्यातील बारा जिल्ह्यातील संक्रमणाचा वेग वगळता उर्वरीत महाराष्ट्रात त्यात कमालीची घट पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य शासनाने आजपासून अनेक जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून पुढील आठवड्याभरात त्यात आणखी काही जिल्ह्यांची भर पडणार आहे. मात्र त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दरही विचार करायला लावणारा असून जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होणार याबाबत साशंकता कायम आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली असून त्यातूनच जिल्ह्यातील सध्याचे निर्बंध आणि शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेचे 368, खासगी प्रयोगशाळेचे 464 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीतून 119 अशा एकूण 951 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सर्वाधीक 324 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात आढळले असून अकोले 82, नगर तालुका 72, श्रीरामपूर 49, इतर जिल्ह्यातील 45, पाथर्डी व राहुरी प्रत्येकी 43, संगमनेर व राहाता प्रत्येकी 39, श्रीगोंदा 38, जामखेड व शेवगाव प्रत्येकी 35, नेवासा 34, पारनेर 27, लष्करी रुग्णालय 18, कोपरगाव 13, कर्जत 9, भिंगार लष्करी परिसर 4 व इतर राज्यातील दोघांचा समावेश आहे.


आज संगमनेर तालुक्यातही 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील सात जणांसह अहमदनगर शहरातील एकाचा समावेश आहे. संगमनेरातील अकोले रोडवरील 50 व 28 वर्षीय महिला, अहमदनगर जिल्हा बँक कॉलनीतील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड रोडवरील 35 वर्षीय महिला, जानकीनगर मधील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पद्मनगरमधील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व शहर पोलीस ठाण्यातील 56 वर्षीय सहाय्यक फौजदाराचा त्यात समावेश आहे. याशिवाय अहमदनगरमधील सारसबाग परिसरातील 43 वर्षीय इसमाचाही संगमनेरच्या बाधित यादीत समावेश आहे.


ग्रामीणभागातील पिंपळगाव निपाणी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्‍वी येथील 57 व 36 वर्षीय महिलांसह सहा वर्षीय बालक, धांदरफळ येथील 34 वर्षीय महिलेसह 32, 30 व 29 वर्षीय तरुण, कनोली येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 22 वर्षीय तरुण, घारगाव येथील 55 वर्षीय इसमासह 34 व 30 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 31 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 69 वर्षीय महिला, वाघापूर येथील 32 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 55 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 49 वर्षीय इसमासह 47, 42 व 33 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी,


गुंजाळवाडी येथील 41 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, 15 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, जोर्वे येथील 39 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 51 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 25 वर्षीय महिला व संगमनेर खुर्द येथील 30 वर्षीय तरुणाचा त्यात समावेश आहे. तालुक्याचा दैनिक सरासरी रुग्ण समोर येण्याचा वेग 20 पेक्षा कमी असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरातून दहाव्या क्रमांकाने रुग्ण समोर येत आहेत. तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या शंभरावर असली तरीही प्रत्यक्षात रुग्णालयातून उपचार घेणार्‍यांची संख्या निम्म्याहून कमी आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 79817

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *