खटारा वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका पालिकेचे दुर्लक्ष; शहरवासीयात संताप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्यावतीने शहरातील कचरा गोळा करण्यासाठी चक्क खटारा वाहनांचा उपयोग केला जात आहे. या खटारा वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीयात संताप व्यक्त होत आहे.

शहरातील कचरा पालिकेच्या ट्रॅक्टर, छोटा हत्ती, टेम्पोच्या साह्याने उचलला जातो. उचललेला कचरा संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोमध्ये साठवला जातो. परंतु यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या या खटारा, बिघाड झालेल्या, गळक्या असतात, तर आता चार चाकी गाडी तीन चाकावरच चालवून अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक अपघाताची घटना घडली होती. मात्र या गंभीर प्रश्नावर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

नगरपरिषदेवर मागील तीन वर्षांपासून प्रशासक आहे. तत्कालीन व आत्ताचे मुख्याधिकारी चांगले काम करत असले तरी इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक असल्याचे दिसत नाही. संगमनेरात पुरेशा स्वच्छते अभावी डासांचे साम्राज्य वाढत आहे. त्यातून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता तर याच स्वच्छता विभागाच्या निकृष्ट वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिघाड झालेले किंवा एखादे पार्ट निकामी झाले तरी असे वाहने कचरा उचलत सांडवत रस्त्यावर धावत असतात. दरम्यान कचरा वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरचे पुढील एक चाक गेल्या काही दिवसांपासून खराब झाले आहे. ते चाक दुरूस्ती करण्याऐवजी ते चाक एका बाजूला वरती करून तीन चाकावरच ट्रॅक्टर चालविला जात आहे. अचानक काही घडल्यास या गाडीवर नियंत्रण मिळविणे चालकासाठी कठिण होईल. तसेच त्यातून अपघाताची शक्यता देखील निर्माण होते.
गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चीला जात असणाऱ्या या तीन चाकी ट्रॅक्टरवर त्वरीत कारवाई करून किंवा सदर ट्रॅक्टरची दुरूस्ती करून तरच त्याद्वारे कचरा उचलावा अशी मागणी होत आहे. स्वच्छता विभागाचे कर्मचारी, सुपरवायझर, ठेकेदार यांनी या वाहनांबाबत अधिक काळजी घेऊन शहरातील कचरा उचलण्याचे नियोजन करावे. अन्यथा काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी अशा संतप्त प्रतिक्रिया शहरातील नागरीकांनी दिल्या आहेत.

मागील १० ते १५ दिवसांपूर्वी तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील एका वयोवृद्ध इसमाचा जुन्या पुणे- नाशिक महामार्गावर संगमनेर खुर्द शिवारातील शिवनेरी दूध संस्थेसमोर पालिकेच्या घंटागाडीला धडकून अपघाती मृत्यू झाला होता. भविष्यात कुठलीही घटना सांगून होत नाही हे पालिका प्रशासनाने लक्षात घेऊन यापुढे पालिकेच्या कचरा वाहनांचा अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Visits: 104 Today: 1 Total: 1593973
