नायक वृत्तसेवा, संगमनेर 
जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंदे निदर्शनास आल्यास त्या त्या पोलिस ठाण्याच्या 
 प्रभारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणाली सोबत झालेल्या बैठकीत दिला.
जिल्हा पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे यांनी मंगळवार दि. १७ जून रोजी दुरदृश्य प्रणालीव्दारे (व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे)  जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेवून, गुन्ह्यांची वेळेत निर्गती करणे, अवैध धंद्याचे उच्चाटन करणेबाबत सर्व अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांना सक्त कारवाईबाबत आदेश दिले आहेत. तसेच पोलीस ठाण्यात  दाखल असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा तात्काळ योग्य तो तपास करुन, गुन्ह्यांची निर्मती करणेबाबत आणि पाहिजे व फरारी आरोपीचा शोध घेवून, योग्य ती कायदेशिर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.  विशेषतः शरिरीराविरुध्द गुन्हे करणारे आरोपी यांचेवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत या बैठकीत विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा हद्दीत कोठेही अवैध धंदे जसे की, अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू विक्री, गोमांस विक्री, अवैध दारु, गांजा, ड्रग्स विक्री, अवैध वाळु, गौणखनिज उपसा व विक्री, अवैध हत्यार विक्री व बाळगणे, अवैध पेट्रोलियम पदार्थ विक्री, अवैध वाहतुक, जुगार, विंगी,ऑनलाईन जुगार तसेच वाहन चोरी व विक्री, महिला व बालक यांचे अनुषंगाने अनैतिक मानवी तस्करी, पिटा व इत्यादी अशा प्रकारच्या अवैध धंद्याचे शंभर टक्के समूळ उच्चाटन करावे. ज्या ठिकाणी अवैध धंदे चालु आहेत, अशा ठिकाणी  छापे टाकुन अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करावे. नमुद कारवाई केलेल्या ठिकाणी नियमीत भेट देऊन वारंवार केसेस कराव्यात. अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांना कायदेशीर व्यवसाय करणेबाबबतचे समुपदेशन करावे.प्रतिबंधात्मक कारवाई करून, सराईत गुन्हे करणारे गुंड, गुन्हेगारांनविरुध्द पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून कडक कायदेशिर कारवाई करुन अवैध धंद्याचे पुर्णतः उच्चाटन करावे अशा सुचना बैठकीत दिलेल्या आहेत. तसेच पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक  स्वतः घेणार असलेबाबत कळविलेले आहे. तसेच पोलीस अधीक्षक यांनी नेमलेल्या विशेष पथकाने पोलीस ठाणे हद्दिमध्ये छापे टाकले असता, कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निर्देशनास येईल, त्यांस संबंधीत पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी  जबाबदार राहतील व त्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारच्या सुचना दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे हद्दीत कोणतेही अवैध धंदे सुरु होणार नाहीत, याची दक्षता घेणेबाबतच्या सक्त सुचना दिल्या आहेत. तसेच पोलीस अधीक्षक यांनी नियुक्त केलेले विशेष पथक कायम कार्यरत राहणार आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत  बेकायदा दारू, गुटखा अशा अवैद्य व्यवसायाबरोबरच,  बहुचर्चित वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीतून अनेकदा वादीवाद होत असतात. निर्ढावलेल्या वाळू तस्करांनी अनेकदा महसूलच्या कर्मचाऱ्यांना आरेरावी, प्रसंगी मारहाण केल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जिल्ह्यातील नदीकाठावरील गावातील वाळू तस्करी आणि त्यातून फोफावलेल्या गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्याची आवश्यकता आहे.