पोलीस निरीक्षकांच्या वागणुकीने शांतता बैठकीचा फज्जा! कायद्यात रहाल तर, फायद्यात रहाल; बैठकीत वारंवार खडाजंगी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलेला असताना मंगळवारी शहर पोलिसांनी घाईघाईत बोलावलेली शांतता समितीची बैठक शहर पोलीस निरीक्षकांच्या बेताल वागणुकीने वादग्रस्त ठरली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी अनेकांच्या वाहनांवर ‘पोलीस’ नावाचे स्टिकर लावले जात असल्याची बाब उपस्थित केली असता ती गांभीर्याने घेण्याऐवजी पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी ‘अॅडव्होकेट’ चिन्ह असलेल्या अनेक वाहनांचा उल्लेख केल्याने गदारोळ उडाला. त्याचवेळी त्यांना वाडेकर गल्लीतील आत्महत्या प्रकरणाचा ‘कॉल’ आल्याने तो उफाळलेल्या वादात तेलाचे काम करुन गेला. अखेर पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला आणि खडाजंगी वातावरणातच ‘वीज प्रश्नावर’ केंद्रीत होवून शांततेसाठी बोलावलेल्या बैठकीची अशांत वातावरणातच सांगता झाली.
मंगळवारी (ता.3) शहर पोलिसांनी अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलमुर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक बोलावली होती. मात्र अप्पर अधिक्षकाविनाच बैठकीला सुरुवात झाली. यावेळी नियोजनाच्या अभावाने जेमतेम उपस्थित असलेल्या विविध मंडळांच्या व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर उभे राहुन शहर पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी एखाद्या ग्रामीण भागातील गावामध्ये बैठक घ्यावी याप्रमाणे थेट माईक हातात घेवून फर्माने झोडण्यास सुरुवात केली. मात्र उपस्थितांनी त्याला विरोध करीत बैठकीच्या नियमांची जाणीव करुन देत इतिवृत्ताच्या वाचनापासूनच बैठकीला सुरुवात करावी असा आग्रह सुरु केला. त्यावरुन सुरुवातीलाच पोलीस निरीक्षक आणि कार्यकर्ते यांच्यात खडाजंगी झाल्याने वातावरण तापले. मात्र ऐनवेळी पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला.
यावेळी खुद्द पोलीस उपअधिक्षकांनीच इतिवृत्ताचे वाचन करीत बैठकीला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांना स्वागताची जबाबदारी दिली असताना त्यांनी स्वागत करण्याचे सोडून सुरुवातीच्या वादाचा धागा धरुन संगमनेरच्या गणेश मंडळांवर ‘धाक’ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत ‘कायद्यात रहाल तर, फायद्यात रहाल’ असे वक्तव्य केल्याने पुन्हा वाद उफाळला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी संगमनेरातील मंडळांच्या सहकार्यानेच आजवरचे उत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याचा उल्लेख करीत अनेक वाहनांवर बेकायदा ‘पोलीस’ लिहिले जाते त्याकडे अधिकार्यांचे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र सुरुवातीलाच आपल्यावर आलेला रोष पाहुन बिथरलेल्या पोलीस निरीक्षक महाजन यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन देण्याचे सोडून गणपुले यांच्यावरच तोफ डागताना अनेक वाहनांवर ‘अॅडव्होकेट’चे स्टिकरही लावलेले असते असे सांगताच पुन्हा एकदा बैठकीत गदारोळ उडाला. यावेळी गणपुले यांनी ‘संगमनेर’चा इतिहासही उगळला, मात्र त्याचवेळी वाडेकर गल्लीत झालेल्या आत्महत्येबाबत पोलीस निरीक्षक महाजन यांना ‘कॉल’ आला आणि त्यातून हा गदारोळ काहीवेळ थांबला. मात्र त्यांचा फोन संपताच बैठकीतील सदस्यांनी आम्हीही हातातले काम सोडूनच बैठकीला आलो आहोत, बैठक सुरु असताना मांडल्या जाणार्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे सोडून फोनवर बोलण्याचा प्रकार योग्य नसल्याचे सांगत पुन्हा गोंधळ सुरु केला.
यावेळीही पोलीस उपअधिक्षकच पुढे सरसावले व त्यांनी मूळ विषयाकडे सर्वांना खेचून घेत उत्सवातील समस्यांवर चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून वारंवार खंडीत होणारा वीजेचा ज्वलंत प्रश्न समोर आला. मात्र त्याला उत्तर देण्यासाठी वीज कंपनीचा सक्षम अधिकारीच हजर नसल्याने पुन्हा गोंधळ उडाला. त्यातून कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना बोलावून त्यांच्याच तोंडून ‘शब्द’ देण्याची मागणी धरली गेली. त्यानंतर खड्डेमय झालेल्या संपूर्ण शहरातील रस्त्यांचाही विषय समोर आला. यावेळी पालिकेचे दुय्यम अधिकारीच उत्तर देवू लागल्याने पुन्हा गोंधळ उडाला. त्यातच वीज कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी हजर झाले व त्यांनी उत्सवाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जातीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गोंधळातच अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलमुर्गे यांचे आगमन झाले.
हजर होताच शांतता बैठक कमालीची तापलेली असल्याचा त्यांनाही आभास झाला. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांनी दोन्ही अधिकार्यांच्या बदल्या झाल्याचे सांगत जुन्या अधिकारी व कर्मचार्यांना हाताशी धरुन आपल्यालाच या उत्सवाचे नियोजन करावे लागणार असल्याचे सांगितले. त्यावर उपस्थितांनी बढतीवर बदली झालेल्या उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना उत्सव संपेपर्यंत थांबवण्याची विनंती केली, मात्र त्यांच्याबाबत कोणत्याही क्षणी आदेश येण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी कोणताही शब्द दिला नाही. एकंदरीत ऐन उत्सवाच्या तोंडावर पोलिसांनी घाईघाईत बोलावलेल्या बैठकीचा नियोजनाच्या अभावाने पूर्णतः फज्जा उडाला.
संगमनेरच्या गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. 2012 साली नदीपात्रात विसर्जनासाठी पाणी नसल्याच्या कारणावरुन शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती 60 हजार गणपती बाप्पांचे विसर्जन तब्बल 19 व्या दिवशी प्रवरा वाहती झाल्यानंतर करण्यात आले होते. त्यामुळे हा उत्सव पार पाडताना प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करण्याची गरज असताना या बैठकीचे निमंत्रणं ठराविक गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांसह केवळ राजकीय पक्षांच्या पुढार्यांना देण्यात आले होते. आश्चर्यकारक म्हणजे गेल्या सात वर्षांपासून विसर्जनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारुन ‘वेदनामुक्त’ उत्सवाची पंरपरा रुजवणार्या बजरंग दलाला या बैठकीची माहितीही देण्यात आली नाही.
सध्या अकोले तालुक्यातील मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेली धरणं यामुळे नद्यांना महापूर येण्याची स्थिती आहे. अशावेळी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीची निमंत्रणे सर्व गणेशे मंडळांसह संस्था, संघटना, नागरीक व अधिकार्यांना देवून अधिकाधिक उपस्थितीत बैठक पार पडणे अपेक्षित होते. मात्र वेगळ्याच विश्वातून आलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी बोलावलेल्या या बैठकीला पोलीस उपअधिक्षक वगळता प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, वीज मंडळाचे वरीष्ठ, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी यातील एकही उपस्थित नसल्याचे धक्कादायक चित्र बघायला मिळाले.