संगमनेरकरांनो, कोविडची धावगती पुन्हा वाढत आहे!

संगमनेरकरांनो, कोविडची धावगती पुन्हा वाढत आहे!
नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून वाढतोय प्रादुर्भाव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऑक्टोबरचा सूर्य संगमनेरकरांसाठी दिलासा घेवून उगवला खरा, मात्र ग्रामीण क्षेत्रातील काही भागात अजूनही कोविडबाबत गांभिर्य पाळले जात नसल्याने शहर शांत होत असतांना ग्रामीणभागात रुग्णसंख्येतील चढ-उतार मात्र कायम आहे. त्यातच सुरुवातीला लक्षणे दाखवणार्‍या या महामारीचा आता संसर्गच दिसत नसल्याने प्रादुर्भावाचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे मास्कशिवाय बाहेर फिरणं अख्ख्या कुटुंबासाठी घातक ठरत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी आनंदवाडीसह पठारभागात झालेला कोविडचा उद्रेक हेच सांगत आहे. त्यामुळे आपली एक चूक आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी धोकादायक ठरु शकते याचे प्रत्येकाने स्मरण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.


मागील महिन्यात सरासरी 51 रुग्ण दररोज समोर येत असतांना चालू महिन्यात मात्र तालुकावासियांना मोठा दिलासा मिळाला होता. या महिन्यात सुरुवातीच्या सहा दिवसांत शहरातील तुरळक रुग्णांसह तालुक्यातूनही समोर येणार्‍या रुग्णांची संख्या रोडावली होती. पहिल्या सहा दिवसांचा विचार करता दररोज सरासरी 42.33 या वेगाने तालुक्यातील रुग्ण वाढत होते. या सहा दिवसांतील शहरी रुग्णवाढीचा सरासरी वेग प्रती दिवस 9.5 (57 रुग्ण) तर ग्रामीण रुग्णवाढीचा वेग 32.83 (197 रुग्ण) होता. त्यामुळे शहरा पाठोपाठ ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही आटोक्यात येत असल्याचे आशादायी चित्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याने दाखवले होते.


मात्र, दुसर्‍या सहा दिवसांत हे चित्र पालटले. शहरीभागात संगमनेर नगरपालिकेच्या घंटागाड्यांपासून ते राजेंद्र सूरग या कोविड योद्ध्यापर्यंतची यंत्रणा जनजागृतीचे काम झोकून करीत असल्याने नागरिकांमध्ये कोविडविषयी जागृती होण्यास मोठी मदत मिळाली आहे. त्याचा परिणाम नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडतांना नियमांनाही सोबत घेत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दुसर्‍या सहा दिवसांतही शहरीभागात बघायला मिळाला. या सहा दिवसांत शहरात अवघ्या 7.33 प्रती दिवस वेगाने एकूण 44 रुग्ण समोर आले. गेल्या 12 दिवसांची आकडेवारी बघता शहरात प्रती दिवस 8.42 वेगाने एकूण 101 रुग्णांची नव्याने भर पडली आहे.


तर ग्रामीण भागात दुसर्‍या सहा दिवसांत संक्रमणाची गती तब्बल प्रतीदिवस पाच रुग्णांनी वाढल्याचे समोर आले आहे. ग्रामीणभागातील विधी, सोहळे व अन्य कार्यक्रमांसह नियमांकडे दुर्लक्ष करुन धोंडे जेवनाच्या कार्यक्रमांचीही रेलचेल असल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. या सहा दिवसांतील आकडेवारीतून या भागात संक्रमणाची गती वाढल्याने पहिल्या सहा दिवसाच्या तुलनेत दुसर्‍या सहा दिवसांत संक्रमणाचा वेग वाढून तो 37.67 झाला. त्यामुळे या सहा दिवसांत ग्रामीणभागातून 226 रुग्ण समोर आले. एकूण तालुक्याचा विचार करता पहिल्या सहा दिवसांत रुग्णवाढीचा सरासरी वेग 42.33 तर दुसर्‍या सहा दिवसांतील वेग प्रती दिवस 45 झाला आहे.


सोमवारी आनंदवाडी येथे कोविडचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. येथे झालेल्या संसर्गातून एकाच कुटुंबातील आठजण बाधित झाले आहेत. त्यामागील कारणांचा शोध घेतला असता ‘त्या’ कुटुंबातील एक सदस्य हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरील कर्मचारी आहे. त्याला संसर्ग झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून तो त्याच्या कुटुंबात पोहोचला आणि आज आनंदवाडीतील त्याचे जवळपास संपूर्ण कुटुंबच बाधित असल्याचे सोमवारच्या अहवालातून समोर आले. मास्क न वापरणे, नियमांकडे दुर्लक्ष करुन आपला नियमित नागरी संपर्क कायम ठेवणे या गोष्टी या संसर्गाच्या मूळाशी असल्याचेही या उदाहरणातून स्पष्ट दिसत आहे.


सद्यस्थितीत कोविडच्या विषाणूंनी आपली पद्धत बदलली आहे. त्यामुळे बाधित झालेल्या व्यक्तिला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ज्याची शारीरिक क्षमता प्रबळ आहे, तो या विषाणूंना सोबत घेवून गावभर फिरत असतो. त्यातून कमकुवत शरीराचा माणूस त्याच्या संपर्कात आला की तो संक्रमित होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा यापुढे अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. मास्कशिवाय बाहेर पडणे आता जीवघेणे ठरण्याची शक्यता असल्याने विशेष करुन ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दहावे, विधी, सोहळे या सारख्या कार्यक्रमातून अनेकांना बाधा झाली आहे, अशा कार्यक्रमांना जाण्याचे टाळल्यास संक्रमण नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होवू शकते.

गेल्या 1 ऑक्टोबरपासून तालुक्याच्या रुग्णसंख्येत दररोज सरासरी 43.66 वेगाने 524 रुग्णांची भर पडली आहे. यात शहरी भागातील केवळ 101 रुग्णांचा समावेश आहे. या महिन्यातील एकूण रुग्णसंख्येत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 80.73 टक्के असून शहरी रुग्णसंख्या 19.27 टक्के आहे. शहरात दररोज 8.42 वेगाने तर ग्रामीण क्षेत्रात 35.25 वेगाने रुग्ण समोर येत आहेत. गेल्या बारा दिवसांत सापडलेल्या रुग्णांमध्ये 372 रुग्ण रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा, 143 रुग्ण खासगी प्रयोगशाळेद्वारा तर अवघे नऊ रुग्ण शासकीय प्रयोगशाळेकडून निष्पन्न झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *