नायक वृत्तसेवा, संगमनेर
विघ्नहर्ता ट्रस्ट, आसनगाव या संस्थेचे दिवंगत अध्यक्ष तथा तालुक्यातील निमगाव जाळीचे मूळ रहिवासी डॉ. शिवाजीराव सखाराम जोंधळे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून इन्कमटॅक्स  विभागाच्या पोर्टलवर अनधिकृत बदल केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती गीता खरे (वय ६७) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, ट्रस्टचे माजी कर्मचारी किशोर भाऊसाहेब जोंधळे (रा. डोंबिवली) यांनी ३० एप्रिल २०२४ रोजी संस्थेतून राजीनामा दिल्यानंतर देखील ट्रस्टची कागदपत्रे व डिजिटल स्वाक्षरी संबंधित पेनड्राईव्ह अधिकृत ट्रस्टींना न देता स्वतःकडेच ठेवले. यानंतर त्यांनी माजी सदस्य तात्याबा मुरलीधर शेपाळ (ज्यांनी २०२० मध्ये ट्रस्टमधून राजीनामा दिला होता) यांच्यासोबत संगनमत करून १ एप्रिल २०२५ रोजी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर लॉगइन केले.या लॉगइनद्वारे त्यांनी संस्थेच्या अधिकृत ‘Key Person’ च्या नावात बदल करून, स्नेहा माने (सध्याच्या सेक्रेटरी) यांच्याऐवजी तात्याबा शेपाळ यांचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अपडेट केला. याशिवाय, डिजिटल स्वाक्षरी विभागात किशोर जोंधळे यांचा ईमेल आणि मोबाईल नमूद केला.
ही बाब लक्षात आल्यानंतर गीता खरे आणि स्नेहा माने यांनी तत्काळ आयकर विभागाशी संपर्क साधून नव्याने पासवर्ड रिसेट करून अधिकृत माहिती सादर केली.
या प्रकारामुळे ट्रस्टच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या गंभीर फसवणुकीप्रकरणी शाहापूर पोलीस ठाण्यात भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६५, ६६(सी), ७१ आणि १७२ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ०१८४/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपींविरोधात लवकरच कठोर कारवाई होण्याची मागणी केली आहे.
शहापूर पोलिसात संस्थेच्या उपाध्यक्षा गीता खरे यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रस्टचे माजी कर्मचारी असलेले किशोर भाऊसाहेब जोंधळे आणि माजी सदस्य तात्याबा मुरलीधर शेपाळ यांनी शिवाजीराव सखाराम जोंधळे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे.हे दोघेही संगमनेर तालुक्यातील अनुक्रमे निमगाव जाळी आणि ओझर खुर्द येथील मुळ रहिवासी आहेत.