सद्गुरूं यशवंतबाबा पुण्यतिथी सोहळा! उंचखडक बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील उंचखडक बुद्रुक (राममाळ) येथील श्री सद्गुरू यशवंतबाबा यांच्या ७८ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १६ ते २३ जून दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या सप्ताह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोले शहरापासून हाकेच्या अंतरावर प्रवरा नदीकाठी वसलेल्या श्री क्षेत्र राममाळ येथे नुकताच प्रभू श्रीराम मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. अतिशय शांत व नयनरम्य परिसरात आज सोमवारी सकाळी ९ वाजता मार्गदर्शक योगी केशवबाबा चौधरी, मनोहरबाबा भोर, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली घटस्थापना व धर्म ध्वजारोहण होवून या सप्ताह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण सप्ताह काळात सायंकाळी ७ ते ९ या वेळेत अनेक नामवंत कीर्तनकारांचे प्रबोधनरुपी कीर्तने होणार आहेत. त्यानंतर अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जून रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे. या दिवशी सकाळी ८ ते १० या वेळेत दिंडी प्रदक्षिणा व नंतर १० ते १२ या वेळेत निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर समस्त बेलदार समाजाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तत्पूर्वी सालाबादप्रमाणे देण्यात येणारा श्री सद्गुरू यशवंतबाबा वारकरी जीवन गौरव पुरस्कार (मरणोत्तर) वै. नामदेव भिकाजी देशमुख महाराज (सुगाव बुद्रुक) यांना देण्यात येणार आहे. सप्ताहासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ सावंत, उपाध्यक्ष, तसेच अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख, सरचिटणीस योगी केशवबाबा चौधरी, देवस्थानचे महंत विठ्ठलपंत गोंडे महाराज व सर्व विश्वस्त मंडळाने केले आहे.

Visits: 190 Today: 1 Total: 1417045
