‘गीता परिवाराच्या संस्कार वाटिकेने’ व्यापल्या त्रेचाळीस देशांच्या सीमा! राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पावणे तीन लाख विद्यार्थ्यांचा ई-संस्कार वर्गात सहभाग
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अवघे जग विस्कळीत झाले आहे. उद्योग, धंदे बंद असल्याने सर्वत्र मरगळ आल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून शाळाही बंद असल्याने घरातच राहून विद्यार्थीही कंटाळले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी गीता परिवाराचा ‘ई-संस्कार वाटिका’ उपक्रम आनंदासह संस्कारांचे सिंचन करणारा ठरला आहे. विशेष म्हणजे सलग दुसर्या वर्षी ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारा होत असलेल्या या संस्कार वर्गातून 43 देशातील 2 लाख 67 हजारांहून अधिक मुलांपर्यंत संस्कारांची गंगोत्री पोहोचली आहे. यावर्षीच्या उपक्रमात जवळपास एक हजार शाळांसह 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत नोंदणी केली असून 16 मे पासून सुरु झालेला हा उपक्रम 30 मे पर्यंत चालणार असल्याची माहिती गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.
गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळापासून गीता परिवाराच्या माध्यमातून बालसंस्काराचे कार्य सुरु आहे. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराजांच्या प्रेरणेतून स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या आज देशभरातील पंचवीस राज्यांमध्ये शाखा स्थापित झाल्या आहेत. गेल्यावर्षी संपूर्ण जगात कोविड संक्रमणाला सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण जगात टाळेबंदी घोषीत झाली. उद्योग, धंदे, व्यवसाय, पर्यटन आणि शाळा सगळ्यांना कुलूपं लागली. काही दिवसांत हे संकट टळेल अशी आशा असताना आज वर्ष उलटले तरीही कोविडचा प्रादुर्भाव थांबलेला नाही. त्यामुळे गेल्या वर्षभर जगभरातील नागरिक कोविड नियमांच्या पालनात गुरफटल्याचे चित्र आपण सगळे पाहत आहोत.
या लॉकडाऊनमुळे चंचलता हा स्थायीभाव असलेल्या मुलांचे जीवन तर अतिशय कंटाळवाणे झाल्यासारखी स्थिती आहे. शाळा बंद, मित्र-मैत्रिणींची भेट नाही, धम्मालमस्ती नाही. सारखं घरातच राहून मुलांचा स्वभावही बदलत आहे. त्यावर उपाय म्हणून गीता परिवाराने गेल्यावर्षी पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी दरवर्षीच्या उन्हाळी वर्गांचे स्वरुप बदलून ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘ई-संस्कार वाटिका’ हा उपक्रम सुरु केला. यावर्षी या उप्रकमात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील 43 देशांमधून 1 लाख 10 हजार मुलांनी नोंदणी केली. त्याशिवाय देशातील 997 शाळांमधील दीड लाखांहून अधिक विद्यार्थीही संस्कार सिंचनाच्या या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
व्हॉट्सअॅप या सोशल प्लॅटफॉर्मवर ‘ई-संस्कार वाटिका’ नावाने साडेपाचशे समूह तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे नोंदणी करुन सहभागी झालेल्या मुलांना दररोज आठ व्हिडिओ पाठविले जातात. त्यात नित्य प्रार्थना, स्वामी गोविंददेव गिरीजी यांचे सद्गुणों की साधना’, डॉ.संजय मालपाणी यांचे ‘जानो गीता-बनो विजेता’, कथाकथन सदरात ह.भ.प.चारुदत्त आफळे यांचे ‘संतांच्या चरित्र कथा’ आणि श्रीमती रेखा मुंदडा यांच्या पौराणिक कथांमधील प्रेरणादायक ‘बालनायकांच्या कथा’, तसेच सुवर्णा मालपाणी यांच्याकडून महिषासूरमर्दिनी स्तोत्राच्या दोन श्लोकांचे दररोज पठण शिकवले जाते.
मुलांच्या मनोरंजनाचा विचारही ई-संस्कार वाटिकेत करण्यात आला आहे. त्यासाठी अनुराधा मालपाणी या कागदापासून विविध आकर्षक वस्तु कशा तयार कराव्यात हे आपल्या ‘क्राफ्ट’ या कार्यक्रमातून शिकवतात. लहान मुलांना जादू आणि जादूगाराचे विशेष आकर्षण असते. त्याचा विचार करुन कुंदन जेधे मुलांना छोटे-छोटे गंमतीशीर जादूचे प्रयोग करुन दाखवतात. आपल्या अवतीभोवती घडणार्या परंतु आपल्याला ज्ञात नसलेल्या विज्ञानाच्या विविध प्रयोगातून मुलांमधील जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्नही यातून होत आहे. मुले आणि खेळ या सूत्राची सांगड घालून ओम दरक मुलांना धम्माल खेळातून आनंद मिळविण्याचे धडे देत आहेत.
याशिवाय मुले स्वस्थ राहिली पाहिजेत यासाठी ई-संस्कार वाटिकेत योगासन आणि यौगिक व्यायामालाही महत्त्व देण्यात आले आहे. योगप्रशिक्षक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी योगासनांचे विविध प्रकार तर सोलापूरच्या संगीता जाधव व भुवनेश्वरी जाधव या यौगिक व्यायामाच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण देत आहेत. विशेष उपक्रम या सदरात ‘आपले सण व उत्सव’ या विषयी अंजलि तापडिया सखोल माहिती व त्या सणाचे महत्त्व याबाबत विस्तृत माहितीही देतात. मुंबईच्या हेमा फाऊंडेशनद्वारा मूल्यवर्धक लघुपटही मुलांना दाखवले जातात. या सर्व व्हिडिओंवर आधारित दररोज दहा प्रश्न विचारले जातात. त्याची बरोबर उत्तरे देणार्या पहिल्या शंभर जणांना बक्षिसेही दिली जातात. त्यातून मुलांच्या एकाग्रता शक्तीचा विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मागील वर्षी लॉकडाऊनला पर्याय म्हणून गीता परिवाराने दरवर्षीच्या उन्हाळी संस्कार वर्गांच्या जागी ई-संस्कार वाटिका हा ऑनलाईन संस्कार वर्गाचा कार्यक्रम सुरु केला. अनपेक्षितपणे यावर्षीही लॉकडाऊनची व्याप्ती वाढल्याने सलग दुसर्या वर्षी देशभरातील पंचवीस राज्यांमध्ये व्याप असलेला हा उपक्रम राबविला जातोय. या वर्षीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘गीता पाठांतर’ उपक्रमानंतर देशाच्या सीमा ओलांडून जाणारा हा सलग दुसरा उपक्रम ठरला आहे. यावर्षी जगभरातील विक्रमी 2 लाख 67 हजारांहून अधिक मुलांपर्यंत ई-संस्कार वाटिकेच्या माध्यमातून संस्कारांची गंगोत्री पोहोचली आहे. हा उपक्रम 30 मे पर्यंत चालणार आहे.