कचराडेपोच्या आगीत लाखोंचे प्लास्टिक भस्मसात! पालिकेच्या उत्पन्नावर घाला; पाच अग्निशमन बंबांद्वारे आगीवर नियंत्रण..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वोत्कृष्ट कंपोस्ट खताची उत्पादक संस्था म्हणून लौकीक मिळवलेल्या संगमनेर नगरपरिषदेचा कचराडेपो आज पुन्हा एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मात्र यावेळी कचर्‍याच्या ढिगार्‍यांऐवजी प्लास्टिकनेच पेट घेतल्याने त्यात विक्रीसाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या लाखों रुपयांच्या गाठी जळून भस्मसात झाल्या. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेल्या या भयंकर आगीवर तब्बल पाच तासांच्या शर्थीनंतर पालिका, कारखाना आणि अकोल्याच्या एकूण पाच अग्निशमनबंबांनी नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत पालिकेच्या यंत्रसामग्रीचेही मोठे नुकसान झाले असून खतनिर्मिती प्रकल्पाला काहीअंशी खीळ बसणार आहे. आग लागण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरीही सदरचा प्रकार शॉर्टसर्किटच्या कारणाने घडला असण्याची दाट शक्यता आहे.


याबाबत समजलेल्या माहितीनुसार संगमनेर खुर्दच्या शिवारात असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या कचराडेपोत आज (ता.13) पहाटे साडेपाचच्या सुमारास सदरची दुर्घटना घडली. संरक्षक भिंतींनी वेढलेल्या या कचराडेपोच्या मध्यात मोठ्या आकाराची पत्र्याची शेड करण्यात आली असून त्यात कचराडेपोत निर्मित कंपोस्ट खताच्या गोण्यांसह पालिकेची यंत्रसामग्री (मशिनरी) आणि रोजच्या घनकचर्‍यातून वेचून बाजूला केलेल्या प्लास्टिकचा मोठा साठा करण्यात आला आहे. ठराविक प्रमाणात प्लास्टिक जमा झाल्यानंतर त्याची विक्री केली जात असल्याने येत्या आठवड्यात जमा झालेले प्लास्टिक विकले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच आज पहाटे सदरचा प्रकार घडला.


पत्र्याच्या शेडमधून अचानक धुराचे लोळ उठू लागल्याने कर्तव्यावरील कर्मचार्‍याने जावून पाहिले असता गोदामातील प्लास्टिकचा भडका उडाल्याचे त्याला दिसले. त्याने तत्काळ पालिकेच्या अग्निशमन बंबाला सूचना देत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना कळवले. त्यानंतर काही वेळातच मुख्याधिकार्‍यांसह प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ, आरोग्य निरीक्षक अमजद पठाण यांच्यासह पालिकेचा फौजफाटाही कचचराडेपोत हजर झाला. तो पर्यंत आगीने रौद्ररुप धारण केल्याने पालिकेच्या तीन अग्निशमन बंबांसह स.म.थोरात साखर कारखाना आणि अकोले नगरपंचायतीच्या बंबांनाही पाचारण करण्यात आले.


पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत पालिकेच्या संगमनेर खुर्द कचराडेपोतील सुमारे पंधरा लाखांहून अधिक किंमतीचे प्लास्टिक आणि खतांच्या गोण्या जळून भस्मसात झाल्या असून खतनिर्मिती आणि अन्य कामांसाठी वापरल्या जाणार्‍या यंत्रसामग्रीचेही (मशिनरी) मोठेे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे सध्या हंगाम सुरु असतानाही पालिकेच्या कंपोस्ट खताच्या निर्मितीला काहीअंशी खीळ बसणार आहे. यावर्षी पालिकेने 50 लाखांची खतविक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यादृष्टीने जोमात काम सुरु असतानाच सदरचा प्रकार घडला. पाच तासांच्या शर्थीनंतर पाच अग्निशमन बंबांनी आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले असून आगीच्या लोळांनी कचर्‍याच्या ढिगांना स्पर्श केलेला नाही.


आज पहाटे साडेपाचच्या सुमारास संगमनेर खुर्द येथील कचराडेपोतील पत्राशेडला आग लागली. त्यात साठवलेल्या प्लास्टिकसह, खताच्या गोण्याही जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे शेडमधील मशिनरीलाही झळा बसल्या असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. पालिका, थोरात कारखाना व अकोले नगरपंचायतीच्या बंबंांनी आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या घटनेने कचरामुक्त डेपो करण्याच्या आमच्या स्वप्नांना बाधा आली आहे, मात्र हा अडथळा ओलांडून आम्ही पुन्हा उभारी घेवू आणि नव्या दमाने पुन्हा आमचे प्रयत्न अवितरपणे पुढे नेवू असा विश्‍वास आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
रामदास कोकरे
मुख्याधिकारी तथा प्रशासक, संगमनेर नगरपरिषद

Visits: 84 Today: 1 Total: 1114879

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *